पुणे : पुढारी वृत्तसेवा : काही आठवड्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खाजगी संस्थेला केबल टाकण्यासाठी खोदाई करू दिली. तसेच खोदाईचे कारण खोटे सांगितले. या प्रकरणी पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे हे गुरुवारी सकाळी पाषाणकडे जात होते. त्या वेळी अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणार्या आणि काही आठवड्यांपूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून ढाकणे यांनी संबंधित अभियंत्याकडे खोदाईच्या कारणाबाबत विचारणा केली. पाईपलाईनच्या खोदाईसाठी अत्यावश्यक बाब म्हणून खोदाई करण्यात आल्याचे अभियंत्याने सांगितले; परंतु या रस्त्यावरील पाईपलाईनच्या कामासाठी मी स्वत: पाणीपुरवठा विभागाकडे तगादा लावून वेळेत काम करून घेतले आणि रस्त्याचे डांबरीकरणही केले आहे, मग आता कोणत्या पाईपलाईनचे काम काढले? असा प्रश्न ढाकणे यांनी विचारला. तसेच खोदाईची परवानगी मागितली. त्या वेळी अभियंत्याचे पितळ उघडे पडले. कार्यालयात परतताच ढाकणे यांनी संबंधित अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश काढण्याची सूचना केली.
कात्रज- कोंढवा रस्त्यावर काही ठिकाणी पर्यायी रस्ता करण्याचे काम सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून नागरिकांनी हे काम अडविल्याने थांबले आहे; परंतु दोन दिवसांपासून हे काम थांबले असल्याबाबत वरिष्ठांना कळविले नसल्याने येथील कनिष्ठ अभियंत्यालाही नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.
शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, पदपथ दुरुस्त व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात असताना पथ विभागातील काही अधिकारी कामात कुचराई करत आहेत. परस्पर रस्ते खोदाईला तोंडी मान्यता देत आहेत. काहीजण पदपथावरील अडथळे, राडारोडा उचलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा सात अभियंत्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
हेही वाचा