Nashik 31st : शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर | पुढारी

Nashik 31st : शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- थर्टी-फस्र्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. तर ग्रामीण पोलिसांनी हद्दीतील फार्महाउस, रिसॉर्ट, लॉज, हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. त्या-त्या ठिकाणी येणाऱ्यांची नोंद होत आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे. (Nashik 31st)

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी पार्टीचे नियोजन केले आहे. अनेकांनी हॉटेल्स, तर काहींनी घरातील ओल्या पार्टीचा पर्याय निवडला असेल. मात्र, पार्टीनंतर मद्यसेवन करून अनेक जण वाहने चालवत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी केली जात असून, ग्रामीण पोलिसांनीही नऊ ब्रेथ ॲनालायझरच्या मदतीने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मद्यपी चालकांची वैद्यकीय चाचणी केली जाणार असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मद्यसेवन करून वाहन चालविल्यास १० हजारांचा दंडही वसूल केला जाणार आहे.

पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी (कंसात संख्या)

आडगाव (४), पंचवटी (७), म्हसरूळ (३), मुंबई नाका (३), भद्रकाली (२), सरकारवाडा (६), गंगापूर (५), इंदिरानगर (५), अंबड (३), सातपूर (३), उपनगर (३), नाशिकरोड (३), देवळाली कॅम्प (३)

श्वानपथकांची मदत

१ जानेवारीला पहाटे पाचपर्यंत हॉटेलिंग सुरू राहणार असून, मध्यरात्री शहरासह जिल्ह्यात पार्टी रंगण्याची शक्यता आहे. तिथे अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी पोलिस श्वानपथकांसह तपासणी करणार आहेत. ग्रामीण पोलिसांकडील ‘रॉकी- ॲना’ हे दोन श्वान अमली पदार्थांचा शोध घेतील. तर शहर पोलिस दलातील ‘मॅक्स’ हा ‘एनडीपीएस’ पथकाचा श्वान पार्टीमधील अमली पदार्थांचा शोध घेईल.

रिसॉर्ट, फार्महाउसची तपासणी

ग्रामीण भागातील इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर आदी निसर्गरम्य भागांत रिसॉर्ट, फार्महाउस आहेत. या ठिकाणी ही पर्यटक नववर्षाच्या निमित्ताने पार्टीसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी आलेल्यांची तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच पर्यटकांची नोंद संबंधितांनी घेतली आहे की नाही याचीही तपासणी होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button