Nashik News : नववर्षात नाशिकमध्ये बड्या नेत्यांची मांदियाळी | पुढारी

Nashik News : नववर्षात नाशिकमध्ये बड्या नेत्यांची मांदियाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी राजकीय पक्षांकडून सुरू झाली असून, येत्या जानेवारी महिन्यात नाशिक राजकीय घडामोडींचे केंद्र बनण्याचे चिन्ह आहे. राष्ट्रीय युवा संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाशिक जिल्हा बँक असोसिएशनच्या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त उद्धव ठाकरे हे जानेवारीत नाशिक दौऱ्यावर येत असल्यामुळे देश आणि राज्याच्या राजकारणात नाशिकचीच चर्चा आता रंगणार आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. जानेवारीत राजकीय पक्षांकडून या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. नाशिकच्या रामभूमीत पंतप्रधान मोदींसह अनेक बड्या नेत्यांचे जानेवारीत आयोजित केलेले कार्यक्रम या निवडणूक प्रचाराचाच एक भाग असणार आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या १२ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय युवा संमेलनासाठी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येत आहेत. केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे सर्व मंत्री, प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे.

तत्पूर्वी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना (शिंदे गट)चे युवा नेते श्रीकांत शिंदे हे युवा सेनेच्या कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे युवा सेनाही चांगलीच चार्ज झाली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युवा सेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे हे अधिवेशन होणार असून, त्यानंतर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. १९९५ मध्ये नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली होती. नाशिकचा हा शुभशकून आगामी निवडणुकीतही ठाकरे गटाला विजयश्री देणारा ठरावा, अशी ठाकरे गटाला अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा अन‌् उत्तरसभा

शिवसंकल्प अभियानाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे होणार आहेत. सहा जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांचे राज्यभर दौरे सुरू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये, मतदारसंघांमध्ये मेळावे घेणार आहेत. नाशिकमध्ये १३ वा २५ जानेवारीला शिंदे यांची सभा होईल. २५ जानेवारीला ही सभा झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या सभेला ती उत्तरसभा ठरण्याची शक्यता आहे.

जानेवारीअखेर अमित शाह

जानेवारीतील राजकीय सभा, अधिवेशने, बैठकांची सांगता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याने होणार आहे. २७ व २८ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा बँक असोसिएशनचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी गृहमंत्री अमित शाह हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नाशिक जिल्हा बँक असोसिएशनतर्फे यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button