एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल | पुढारी

एसटी सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसमध्ये सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. १ जानेवारीपासून ही नवीन आसनव्यवस्था लागू होणार आहे. नव्या निर्णयानुसार साध्या बसमध्ये विधिमंडळ सदस्यांना १, २ ऐवजी ७ व ८ क्रमांकाचे आसन राखीव असेल.

एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये विविध सामाजिक घटकांना सेवा प्रकारनिहाय सवलती देण्यात येतात. त्यामध्ये विधिमंडळ सदस्यांसोबत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, महिला, अधिस्वीकृती पत्रकार तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व घटकांना साधी, निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान आदी बसेसमध्ये राखीव आसने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

एसटी महामंडळाने सवलतधारी प्रवाशांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात येईल. तत्पूर्वी बसेसमधील आसन क्रमांक बदलण्याची कार्यवाही यंत्र अभियांत्रिकी खात्यातर्फे स्टिकर्स लावून केली जात आहे. पूर्वीचे आसन क्रमांक व सुधारित आसन क्रमांकात तफावत असल्याने प्रवासी तक्रार करू शकतात. त्यामुळे प्रवाशांच्या माहितीकरिता सर्व बसस्थानकांत बस प्रकारनिहाय आसन क्रमांकांचे पूर्वीचे व नवीन सुधारणांचे तक्ते फलकावर प्रदर्शित करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

म्हणून घेतला निर्णय

एसटी महामंडळामध्ये नव्याने ईटीआयएम-ओआरएस कार्यप्रणाली कार्यान्वित झाली आहे. जुन्या कार्यप्रणालीत बसेसचे वेगवेगळे सीट लेआउट उपलब्ध आहेत. बस प्रकारानुसार सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांकदेखील निरनिराळे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे या तक्रारी उद‌्भवू नये म्हणून आसनव्यवस्थेत एकसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button