मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  मी सत्तेत सहभागी झाल्यानेच विकासकामे करणे शक्य होत आहे. सत्तेबाहेर असतानाही कामे होऊ शकत नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही, माझे चॅलेंज आहे, असेही ते म्हणाले. येथील जिजाऊ भवनमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. प्रदीप गारटकर, केशवराव जगताप, पुरुषोत्तम जगताप, प्रशांत काटे, विश्वासराव देवकाते, सचिन सातव, सुनील पवार, पोपटराव गावडे, विक्रम भोसले, संभाजी होळकर, जय पाटील, अविनाश बांदल, अनिता गायकवाड, ज्योती लडकत, प्रणिता खोमणे आदींची या वेळी उपस्थिती होती.

पवार म्हणाले, पाण्याची स्थिती बिकट आहे. गतवर्षी निरा खोर्‍यातील चार धरणांत आजअखेर 90 टक्के पाणीसाठा होता. यंदा तो 72 टक्के आहे. कालवा सल्लागार समितीचा मी प्रमुख आहे. त्यामुळे पाणी येतेय. जनाई-शिरसाई, पुरंदर उपसाची कामे मार्गी लावली जात आहेत. पुरंदर उपसासाठी 70 कोटी रुपये मंजूर केले. बंधारे दुरुस्तीसाठी 7 कोटींचा निधी मंजूर केला आहे. पिण्याचे पाणी, शेती व त्यानंतर उद्योगाला पाणी असे धोरण आपण आखले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यामातून 13 तालुक्यांना मदत केली जात आहे. 25ः15, राज्य सरकारचा निधी, जिल्हा परिषद अशी गोळा बेरीज करून पैसे मंजूर करून घेतले जात आहेत. त्यामुळे निधीचा योग्य विनियोग करा.

बारामतीत जिरायती भागासह शहरात अधिकचे साठवण तलाव उभारले जात आहेत. बारामतीत शिवसृष्टी आकाराला येत आहे. कऱ्हा नदीच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले. आयुर्वेदिक कॉलेज, मेडिकल कॉलेज यासाठी निधी दिला आहे. 56 कोटी रुपयांचे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. मोठी उद्याने केली जात आहेत. विदर्भातील एका उद्योजकाशी माझी नुकतीच भेट झाली. त्यांना बारामतीला आणत 100 कोटींचा सीएसआर फंड नाही मिळवला तर अजित पवार नाव सांगणार नाही, असे ते म्हणाले. राज्यात अन्यत्र एका आमदाराला पाच कोटी रुपये मिळतात. आपल्याकडे एका ग्रामपंचायतीला 8 ते 9 कोटींचा निधी दिला आहे. शहरात जुनी मंडई पाडून तेथे भव्य कॉम्प्लेक्स करत आहोत. उंडवडी ते बारामती रस्ता चारपदरी करत आहोत. तेथे भूसंपादनासाठी 90 कोटी रुपये लागणार आहेत.

सब ठेकेदारीचे धंदे बंद करा
बारामतीत राज्य, केंद्राकडून अनेक विकासकामे आणली जात आहेत. परंतु अलीकडील काळात काम एकाच्या नावावर, करतोय दुसराच अशी स्थिती पाहायला मिळत आहे. अनेक ठेकेदारांनी ही कामे टक्केवारीवर दुसर्‍यांना विकण्याचा धंदा सुरू केला आहे. असले धंदे करू नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

वय झालेय, नाही तर…
पवार म्हणाले, खराडेवाडीची एक महिला मला आज भेटली. तिने पुण्यात शिक्षण संस्था सुरू केली आहे. खराडेवाडीत कॉलेज सुरू करा, अशी तिची मागणी होती. आपण सुप्याला नुकतेच कॉलेज सुरू केले आहे. खराडेवाडीसारख्या छोट्या गावात मुले कोठून मिळणार, असा सवाल तिला मी केला. तर तुम्हीच बघा, असे उत्तर तिने दिले. आता माझे वय झालेय नाही तर आणली असती, असे पवार म्हणाल्यावर हास्यकल्लोळ माजला. मी शांत काम करायचे ठरवले आहे, चिडायचे नाही हे ठरवतोय, पण काही लोक चिडायला भाग पाडतात, असे ते म्हणाले.

Back to top button