

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : शनिवार, रविवार व नाताळ अशा सलग सुट्यांमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीतील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. जेजुरी शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सलग सुट्यांमुळे राज्यभरातील सर्वच देवस्थाने व इतर पर्यटनस्थळे भाविक व पर्यटकांमुळे हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. जेजुरीतही सुट्यांमुळे भाविकांची खंडोबा दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. रविवारी (दि. 24) गडासह शहरात भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्यामुळे जेजुरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गडाच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात कोठेही वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. पुणे- पंढरपूर पालखी मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नाताळची सुटी संपेपर्यंत ही गर्दी राहणार आहे.
शहरात वाहतूक कोंडी
जेजुरीतील पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. दोन दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक व भाविक त्रस्त झाले. जेजुरीतील खंडोबा लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. वर्षाकाठी सुमारे पन्नास लाखांहून अधिक भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येतात. भाविकांमुळे येथे दररोज मोठी वर्दळ असते. त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असते. यासाठी जेजुरी शहराबाहेरून बाह्यवळण काढावे, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :