

गोदाघाटावरील एकमुखी दत्तमंदिरास सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. शेकडो नाशिककरांचे श्रध्दास्थान हे मंदिर आहे. या प्राचीन मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराची निर्मिती नेमकी कशी झाली हेच आपण आज पाहणार आहोत…. (Datta Jayanti 2023)
बर्वे महाराज हे दत्तात्रेयांचे भक्त होते. त्यांनी आपल्या निवासस्थानालगत दत्त प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मंदिराच्या स्थापनेआधी त्या जागेवर पडके घर मठाच्या रूपात हाेते. मंदिराला लागणारे बांधकामाचे साहित्य वाळू, विटा, पाणी हे सर्व तांब्याच्या भांड्यात आणून सोवळ्यात राहून संपूर्ण कुटुंबाने हे बांधकाम केले. सर्व पूजाविधी करत या मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. (Datta Jayanti 2023)
सुरुवातीच्या काळात या मंदिरात फारसे कोणी येत जात नव्हते. परंतु काही काळानंतर लोकांना जशी प्रचिती येत गेली, तशी मंदिरात भक्तांची गर्दी वाढायला लागली. आता दररोज हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात अन्नदानही केले जाते. सध्या या मंदिरात दत्त जन्मोत्सव सुरु असून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ही वर्षी अनेक कार्यक्रम आहेत.
मंदिराला गादी परंपरा
या मंदिराला गुरू-शिष्याची म्हणजेच गादी परंपरा आहे. सदगुरु बर्वे महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांची आठवी पिढी मयूरेश बर्वे हे सध्या या मंदिराचा संपूर्ण कारभार बघत आहेत. श्री दत्तमंदिरास सुमारे साडेतीनशे वर्षे झाली आहेत.
कशी झाली मंदिराची निर्मिती? काय आहे आख्यायिका?
मंदिराचे पूर्वज म्हणजे मठाधिपती सद्गुरु बर्वे महाराज हे दत्तप्रभूंचे भक्त होते. त्यांना एकदा स्वप्नात दत्त भगवंतांचा दृष्टांत झाला आणि ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात एक वालुकामय मूर्ती आली. ती वालुकामय मूर्ती अत्यंत देखणी, प्रसन्न, सुहास्य वदनाची होती. जणू भगवंत आपल्या घरी आले, या आनंदात त्यांनी घरातल्या सर्वांना झोपेतून उठवलं. सगळे उठले. दत्तमूर्ती पाहून सर्वांनी मनोभावे प्रणाम केला. त्याच आनंदी वातावरणात दत्तनामाचा गजर घुमला. (Datta Jayanti 2023)
त्यांनी त्या मूर्तीची स्थापना गोदावरी किनारी असलेल्या एका मठात केली. कालांतराने त्याच भव्य मंदिरात रूपांतर झाले आणि शेकडो भाविक दर्शनासाठी येऊ लागले. अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली. कालांतराने सद्गुरू बर्वे महाराज मंदिरालगतच समाधिस्थ झाले. अशी या मंदिराबद्दल आख्यायिका सांगितली जाते.
हेही वाचा :