Birhad Morcha : बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ ‘लखपती’, २२ लाखांचे बिल शासनाला पाठविणार | पुढारी

Birhad Morcha : बिऱ्हाड मोर्चामुळे परिवहन महामंडळ 'लखपती', २२ लाखांचे बिल शासनाला पाठविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) आंदोलनकर्त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी (दि.१९) जिल्हा प्रशासनाला २२ लाख रुपयांचे बिल सादर केले. बिलाच्या या रकमेबाबत राज्यस्तरावर शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व वनपट्टेधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक शेतकरी संघातर्फे नंदुरबार ते मुंबई असा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता. नऊ दिवसांचा पायी प्रवास करून सोमवारी (दि.१८) नाशिकमध्ये पोहोचलेल्या या मोर्चाच्या शिष्टमंडळात व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये तब्बल चार तासांची मॅरेथॉन बैठक झाली. बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर नाशिकमध्ये मोर्चा स्थगित करत माघारी फिरण्याचा निर्णय मोर्चेकऱ्यांनी घेतला. त्यानुसार आंदोलनकर्त्यांचा घराकडील परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या. (Birhad Morcha)

एसटी महामंडळाच्या ठक्कर बाजार बसस्थानकामधून विविध मार्गांवर ४९ बसेस रात्री सोडण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या बसेसचे २२ लाख रुपयांचे बिल एसटी महामंडळाने आता जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. हे बिल शासनस्तरावर पुढील कार्यवाहीसाठी पाठविणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपातळीवरून बिलाची रक्कम येईपर्यंत एसटी प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागले.

अधिकारी ठाण मांडून (Birhad Morcha)

जिल्हा प्रशासनाने मोर्चेकऱ्यांकडून कोणत्या मार्गावर बसेस सोडायच्या याची यादी घेतली. या यादीनुसार नंदुरबार, नवापूर, साक्री, सटाणा, कन्नड, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील विविध तालुक्यांसाठी बसेस रवाना करण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांना घेऊन पहिली बस रात्री ९ ला निघाली. शेवटची बस मध्यरात्री अडीचच्या सुमाराला रवाना झाली. तोपर्यंत महसूल व एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बसस्थानकात ठाण मांडून होते.

हेही वाचा

Back to top button