वॉशिंग्टन : सुदूर अंतराळातूनही आता एचडी व्हिडीओ शेअर करणे शक्य झाले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने पृथ्वीपासून 3.1 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या 'सायकी' अंतराळयानातून अल्ट्रा एचडी व्हिडीओ शेअर केला. सुदूर अंतराळातून पृथ्वीवर इतक्या उच्च दर्जाचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाठवण्यात आला आहे. 15 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक मांजर लेझर लाइटचा किरण पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या मांजराचे नाव आहे 'टॅटर्स'. 'नासा'च्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ पाठवण्यास सुमारे 101 सेकंद लागले. हा व्हिडीओ 267 mbps च्या वेगाने पाठवण्यात आला होता. जेव्हा तो शेअर केला गेले तेव्हा अंतराळयान पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतरापेक्षा 80 पट जास्त अंतरावर होते.
'नासा'ने सांगितले की हे यश महत्त्वाचे आहे कारण या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात उच्च-डेटा शेअर करण्यासाठी केला जाऊ शकतो. मानवाला मंगळावर पाठवण्याच्या मोहिमेत ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा व्हिडीओ सायकी स्पेसशिपमधून लेझर ट्रान्सीव्हरद्वारे व्हिडीओ पृथ्वीवर पाठवण्यात आला होता. हे अंतराळ यान मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्यापर्यंत प्रवास करत आहे, जेणेकरून ते गूढ धातू शोधू शकेल. हेल टेलिस्कोपद्वारे व्हिडीओ सिग्नल प्राप्त झाला. नासाने सांगितले की लाखो मैलांच्या अंतरावरून ब्रॉडबँड व्हिडीओ शेअर करणे हा त्याचा एक उद्देश आहे. 'नासा' सध्या संप्रेषणासाठी मजकूर डेटा वापरते.
अंतराळ मोहिमांमध्ये, डेटा सहसा रेडिओ लहरींद्वारे पाठविला जातो आणि प्राप्त केला जातो. लेझर वापरून, डेटा शेअरिंगचा वेग 10-100 पट वाढवता येतो. सायकी स्पेसक्राफ्ट फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून 13 ऑक्टोबर रोजी प्रक्षेपित करण्यात आले. या प्रयोगासाठी डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) प्रणालीचा वापर करण्यात आला. ही 'डीएसओसी' प्रणाली सायकी स्पेसक्राफ्टवर स्थापित करण्यात आली होती. ही प्रणाली लेसर-बीम संदेश पृथ्वीवर परत पाठवण्यासाठी वापरली जाते. 'नासा'ने म्हटले आहे की 14 नोव्हेंबर रोजी सायकी स्पेसक्राफ्टने कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेत हेल टेलिस्कोपशी संपर्क दुवा स्थापित केला. या कम्युनिकेशन लिंकच्या यशस्वी वापराला 'फर्स्ट लाइट' असे नाव देण्यात आले आहे.