Nashik Cold : बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी | पुढारी

Nashik Cold : बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरामध्ये मंगळवारी (दि. १९) दिवसभर वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी दिवसभर ऊबदार कपडे परिधान करणे पसंत केले. शहरात १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा हा ट्रेन्ड कायम राहण्याचा अंदाज आहे. (Nashik Cold)

हिमालयामधील बर्फवृष्टी तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमधील अवकाळी पावसाचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानामध्ये काही अंशी वाढ झाली असली, तरी थंडीचा जाेर कायम आहे. नाशिक शहराच्या पाऱ्यात दोन अंशांची वाढ होत तो १४ अंशांवर स्थिरावला. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीचा कडाका कायम आहे. शहर व परिसरामध्ये दिवसभर थंड वाऱ्यांचा जाेरदार झोत वाहात होता. त्यामुळे सामान्य नागरिक गारठले. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वेटर, कानटोपी, मफलर, जॅकेट अशा उबदार कपड्यांची मदत घेतली. तसेच ठिकठिकाणी शेकोट्यांभाेवतीही गर्दी पाहायला मिळाली. (Nashik Cold)

शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही थंडीचा जोर कायम आहे. द्राक्षपंढरी निफाडमध्ये पारा १२.१ अंश इतका नोंदविण्यात आला, तर मालेगाव, चांदवड, दिंडोरी, पेठ-सुरगाणा तसेच इगतपुरी अशा तालुक्यांमध्येही किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे जनावरांची काळजी घेण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. दरम्यान, सध्याचे वातावरण गहू-हरभऱ्यासाठी पोषक असले, तरी अन्य पिकांकरिता नुकसानकारक आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button