81 कोटी भारतीयांच्या बँक तपशिलाची चोरी | पुढारी

81 कोटी भारतीयांच्या बँक तपशिलाची चोरी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहिती साठ्यातून 81 कोटी भारतीय नागरिकांची नावे, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक खात्याचा तपशील लांबवून तो डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांनी याप्रकरणी स्वत:हून दखल घेतली होती. अनेक दिवस मागोवा घेऊन या प्रकरणाचा अखेर छडाही लावला. तपासाबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. चालू महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणात खात्री पटल्यानंतर स्वत:च तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करून घेतला होता. देशात आजवर झालेली माहितीची ही सर्वात मोठी चोरी असल्याचे सांगण्यात येते.

गेमिंग प्लॅटफॉर्मवर ओळख

हे चौघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत नव्हते. गेमिंग अ‍ॅपच्या माध्यमातून या चार जणांची तीन वर्षांपूर्वी परस्परांशी ओळख झाली, असे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. चौघांनी आपापसातील चर्चेत कमीत कमी वेळेमध्ये खूप सारे पैसे कमवूया असे ठरविले.

सुरुवातीला त्यांना 1 लाख लोकांच्या आधार व पासपोर्टच्या माहितीचा तपशील मिळाला. त्यानंतर त्यांनी माहिती लांबविण्याच्या तंत्रातील सारे बारकावे जाणून घेतले. आयसीएमआरच्या माहिती डेटामधून तब्बल 81 कोटी भारतीयांच्या पासपोर्ट व आधार, बँक खात्यांचा तपशील त्यांनी लांबविला आणि चक्क डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध केला. लोकांच्या खासगी माहितीचा लिलाव मांडून बोली सुरूच झाली होती आणि तपास यंत्रणेने या चौकडीचा डाव उधळला.

एक आरोपी बीटेक

याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये एक जण ओडिशाचा रहिवासी असून, त्याने अभियांत्रिकीतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अन्य दोघे हरियाणातील, तर एक झांशी शहराचा रहिवासी आहे. हरियाणातील दोघा आरोपींनी शालेय शिक्षणही अर्धवट सोडलेले आहे. चौघांना दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Back to top button