जळगाव जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, घरासमोरुन आठ लाखांची कार केली लंपास | पुढारी

जळगाव जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, घरासमोरुन आठ लाखांची कार केली लंपास

जळगाव : जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, मोटरसायकल-कार यांच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात 2 लाख 44 हजार पाचशे रुपयांच्या तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यात. तर, एका ठिकाणी घरासमोरून कार चोरीला गेली आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकांत गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील शाहूनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळ मुकेश बापूराव चौधरी यांच्या घरासमोरून 8 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा कार क्रमांक  (एम एच 19 डीए 27 77) अज्ञात चोरट्यानी लंपास केली. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.

जळगाव तालुक्यातील सावता नगर मध्ये राहणारे रत्‍नाबाई संदीप पाटील यांच्या घरी घरफोडी झाली. बेडरूम मधील कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले 38 हजार रुपये व सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी जळगाव तालुक्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हे रामकृष्ण इंगळे करीत आहे.

शहरातील विसंगती नगर प्लॉट नंबर 30 / १ पेपर किंग च्या बाजूला असलेल्या मयूर ट्रेडर्स या किराणा दुकानातून पन्नास हजार रुपये रोख घेऊन चोर पसार झाले. या प्रकरणी पुरुषोत्तम मंडोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे. अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील राहणाऱ्या ग भा हिराबाई धर्मराज पाटील या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेलेल्या असताना बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 66 हजार 500 रुपये सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी हिराबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहे.

धुळे येथील रत्‍नाबाई दत्तात्रय जगताप (वय  86) यांची अंमळनेर बस स्थानकावर बस मध्ये चढत असताना साठ हजार रुपयांची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलेला असून हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button