नाशिक : पुढारी वृत्तसेवा-केंद्र सरकारचे पथक बुधवार (दि. १३) पासून दोनदिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक सिन्नर, येवला आणि मालेगाव तालुक्यांना भेटी देऊन दुष्काळाची पाहाणी करणार आहे. केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचा पथकात समावेश आहे. पथकाच्या दौऱ्यानिमित्त महसूल व कृषी विभागाने तयारी केली आहे.
चालूवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी सावट आहे. पुरेशा पावसाअभावी बाजरी, मका, सोयाबीन, कापसासह अन्य पिकांना फटका बसला आहे, तर अर्ध्याअधिक जिल्ह्यात १०० हून अधिक टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. परिणामी ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नाशिकप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्हे, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत दुष्काळ आ वासून उभा ठाकला आहे.
राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी शासनाने केंद्राकडे मदतीचा हात मागितला आहे. तब्बल २ हजार २६१ कोटी रुपये टंचाई निवारणासाठी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येत आहे. हे पथक नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राला सादर करतील. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या नजरा पथकाच्या दाैऱ्याकडे लागल्या आहेत.
पाहणीसाठी अधिकाऱ्यांच्या चार तुकड्या
राज्यात दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय स्तरावरील सचिव दर्जाचे १२ अधिकारी येत आहेत. या अधिकाऱ्यांच्या चार तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिली तुकडी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात पाहाणी करेल. दुसरी तुकडी बीड व धाराशिव, तर तिसरी तुकडी पुणे व सोलापूर तसेच चाैथी तुकडी नाशिक व जळगाव जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
हेही वाचा :