येमेन या देशामधील एका तरुणाला उपचारांसाठी नुकतेच बंगळूरमध्ये आणण्यात आले. 18 वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यात एक बंदुकीची गोळी घुसली होती. तो काही दहशतवादी नव्हता, तर गोळी डोक्यात घुसली तेव्हा आपल्या वडिलांना शेतात मदत करणारा एक छोटासा मुलगा होता. त्यांच्या शेताच्या परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार झाला आणि एक गोळी चुकून याच्या डोक्यामध्ये शिरून बसली आणि तिथेच स्थानापन्न झाली. सुरुवातीला काही तात्पुरते उपचार करून त्याला घरी पाठवून देण्यात आले. परंतु, जसा तो मोठा होऊ लागला, तसे त्याला डोकेदुखी आणि इतर त्रास होण्यास सुरुवात झाली. शेवटी बंगळूर येथील डॉक्टरांना त्याला दाखवण्यात आले आणि त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही अडकलेली बंदुकीची गोळी बाहेर काढली.
तो आता सामान्य जीवन जगत आहे. ही गोळी त्याच्या कान आणि लहान मेंदू यांच्यामध्ये अडकून बसलेली होती आणि अर्थात त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या वेदना होत होत्या. या सर्व वेदनांपासून मुक्ती देण्याचे काम बंगळूर येथील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी पूर्ण केले आणि हा रुग्ण पूर्णत: बरा होऊन आपल्या देशाला परत निघून गेला आहे. अशाच प्रकारची एक बंदुकीची विचित्र गोळी भारतीय देशाच्या मस्तकामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापाठोपाठ घुसून बसली होती. डोक्यात अडकलेली ही गोळी कधी निघेल, असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते; परंतु आज स्वातंत्र्यानंतर तब्बल आठ दशके होण्यास आली असताना ही गोळी यशस्वीरीत्या मस्तकातून बाहेर काढण्यात आली आहे. आता देश निवांत वाटचाल करू शकेल आणि या अडकलेल्या बंदुकीच्या गोळीमुळे होणार्या वेदना हळूहळू कमी होत जातील. आपल्या देशासाठी ही अडकलेली बंदुकीची गोळी म्हणजे काश्मीरचा प्रश्न ही होती.
जम्मू-काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यात आला आणि तेव्हापासून याचे भिजत घोंगडे भिजत पडले होते, ते तसेच राहिले. त्यामधून स्थानिक काश्मिरी पंडितांना परागंदा व्हावे लागले. दहशतवादाच्या सावटाखाली तेथील जनता पार भरडून निघाली आणि काश्मीरचा विकास खुंटला. स्थानिक राजकारणी लोकांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत हा प्रश्न कधीच सुटू नये, यासाठी आपापले योगदान दिले. अनेक सरकारे आली आणि गेली; पण कोणीही या प्रश्नाचे कायमस्वरूपी उत्तर शोधू शकले नाही. ही अशी अवघड शस्त्रक्रिया विद्यमान मोदी सरकारने यशस्वीरीत्या पूर्ण केली. खरे तर इतका जुना प्रश्न सोडवल्याबद्दल देशाने या सरकारचे कायमस्वरूपी ऋणी राहिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीने गेल्या दहा वर्षांत अशक्य अशी कामे करून दाखवली आहेत. त्यात काश्मीरचा प्रश्न सोडवणे हे अग्रक्रमावर आहे. अशाप्रकारचे निर्णय घेण्याचे आणि ते पूर्ण क्षमतेने राबवण्याचे धाडस या सरकारने दाखवले, याबद्दल मनस्वी अभिनंदन. अर्थात, यासाठी जनतेने या सरकारला दिलेले प्रचंड बहुमत तितकेच महत्त्वाचे आहे. काश्मिरात परत येत असलेली शांतता, पुन्हा होत असलेली पर्यटकांची गर्दी आणि असंख्य व्हिडीओंमधून मोदी सरकारला आशीर्वाद देणारे नागरिक हे चित्रच मनाला सुखावणारे आहे.
370 कलम रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिका सुप्रीम कोर्टाने नुकत्याच निकाली काढल्या आहेत आणि शासन निर्णय योग्य होता, यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाबद्दल असणार्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे. आता जम्मू-कश्मीरची उर्वरित भारताबरोबर विकासाची घोडदौड अविरत सुरू राहो, हीच इच्छा.
– बोलबच्चन