Drug case : एमडी कारखान्याची ‘आयडीया’ देणारा उमेश वाघ गजाआड | पुढारी

Drug case : एमडी कारखान्याची 'आयडीया' देणारा उमेश वाघ गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी विक्रीसाठी  (Drug case) सोलापूर येथे कंपनी व गोदाम टाकण्याचा सल्ला संशयित सनी पगारे यास देणारा व एमडी वितरणात महत्त्वाची भूमीका असणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. उमेश सुरेश वाघ (रा. चुंचाळे, नाशिक, सध्या रा. यशवंतनगर, विरार) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. उमेशविरोधात नाशिकसह, मुंबई, पुणे व परराज्यांमध्येही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सामनगाव येथे सापडलेल्या एमडी प्रकरणाचा तपास सुरु असून या गुन्ह्यातील संशयितांना मोक्का लावला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून उमेश फरार होता. बंगळुरू, केरळ, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांत उमेश लपला होता. दरम्यान, गुन्हे शोध एक पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाघ मुंबईत असल्याचे समजले. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, अंमलदार प्रवीण वाघमारे, नाझीमखान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने विरारमध्ये शोध घेत उमेशला पकडले. सामनगाव गुन्ह्यात पोलिसांनी आत्तापर्यंत १३ संशयितांना अटक केली असून त्यातील मुख्य सुत्रधार अद्याप फरार असून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. या संशयिताने आंतरराष्ट्रीय स्तरावर एमडी विक्री केल्याचा संशय आहे. सोलापूर येथील कारखान्यासाठी हैद्राबाद व केरळमधून रसायन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अरजास एम. टी (रा. कोझिकोडा, केरळ) याला अटक केली आहे. (Drug case)

कारागृहात संशयितांची ओळख (Drug case)

संशयित वाघ याने २०१६ मध्ये नाशिकच्या काही संशयितांच्या मदतीने ठाणे शहरातील एका कंपनीत दरोडा टाकून १२ कोटी रुपये लुटले होते. या गुन्ह्यात उमेश कारागृहात होता. कारागृहात त्याची एका संशयिताशी ओळख झाल्यानंतर त्याने एमडीची माहिती घेतली. जामीनावर बाहेर आल्यानंतर संशयित सनी पगारेसोबत त्याने एमडीचे जाळे विणण्यास सुरुवात केली. सोलापुरात कारखाना उघडण्याचा सल्ला सनीला दिला. तसेच कारखान्यातील एमडी वाहतूक करताना खबरदारी म्हणून मोठ्या स्पीकर्समध्ये भरुन नेण्याचा सल्लाही उमेशनेच दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. उमेशने इतर ठिकाणच्या एमडी कारखान्यांमध्येही महत्वाची भूमिका बजाविल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा :

Back to top button