Pune News : लालफितीच्या ग्रहणात अडकला बोगदा | पुढारी

Pune News : लालफितीच्या ग्रहणात अडकला बोगदा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डिंभे ते माणिकडोह या धरणांच्या दरम्यान सुमारे 13 किलोमीटर लांबीचा काढण्यात येणारा भूमिगत बोगदा केवळ शासकीय अनास्थेमुळे रखडला आहे. या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी 350 कोटी रुपयांचा सुप्रमा प्रस्तावित आहे. हा सुप्रमा राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही पुढे कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्याची बाब पुढे आली आहे.

डिंभे धरण आंबेगाव तालुक्यात असून, त्याची क्षमता 12.50 टीएमसी एवढी आहे. तर माणिकडोह हे धरण जुन्नर तालुक्यात असून, त्याची साठवणक्षमता 10.17 टीएमसी एवढी आहे. डिंभे धरणाच्या परिसरात पावसाळ्याच्या दिवसात कायमच जोरदार पाऊस होत असल्यामुळे या धरणात पाणीसाठा मुबलक असतो. या उलट माणिकडोह धरणाच्या परिसरात अतिशय कमी पाऊस पडत असून, गेल्या चाळीस वर्षांत केवळ दोन वेळाच हे धरण भरले होते. मात्र, एरवी केवळ 50 ते 60 टक्केच पाणीसाठा या धरणात होतो. एवढा कमी पाऊस या भागात होत असतो.

ही बाब लक्षात घेऊन डिंभे ते माणिकडोह या दरम्यान भूमिगत बोगदा तयार करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. डिंभे धरणामधील पाणी माणिकडोह धरणात भूमिगत बोगद्याद्वारे नेल्यामुळे पुढे हेच पाणी कुकडी डाव्या कालव्याद्वारे नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील 95 हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचनासाठी देण्यात येणार आहे. डिंभे डाव्या कालव्याला अनेक वर्षे झाल्यामुळे या कालव्याची कार्यक्षमता कमी झाली. त्यास पर्याय म्हणून या भूमिगत बोगद्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी 2010 साली या भूमिगत बोगद्यासाठी 350 कोटी रुपयांचा सुप्रमा तयार करण्यात आला .

त्याचबरोबर बोगद्यासाठी संकल्पना, सुप्रमादेखील तयार करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा प्रस्ताव मागे पडला आणि पुन्हा दुसरा प्रस्ताव 2015-16 साली करण्यात आला आणि लागलीच हा प्रस्ताव सुप्रमासह शासनाकडे जलसंपदा विभागाने दाखल केला. त्यास शासकीय पातळीवर तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या भूमिगत बोगद्यासाठी शासन पातळीवर तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर जलसंपदा विभागाने या बोगद्याचे सर्वेक्षण आणि अन्वेषण करून त्याचा अंतर्भाव कुकडी प्रकल्पाच्या प्रस्तावित सुप्रमात केले. (अजूनही कुकडी प्रकल्पाचा 1 हजार कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.) त्यानुसार या बोगद्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित सुप्रमात केली असून, हा सुप्रमा राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यास बराच काळ लोटला आहे. मात्र, शासन पातळीवर सुरू असलेल्या अनास्थेमुळे या भूमिगत बोगद्याचे काम सुरू झालेले नाही.

हेही  वाचा

Back to top button