Dhule News : चिकसेत जोरदार वावटळीमुळे उडालं शेड, शेतकरी पती-पत्नी थोडक्यात बचावले | पुढारी

Dhule News : चिकसेत जोरदार वावटळीमुळे उडालं शेड, शेतकरी पती-पत्नी थोडक्यात बचावले

पिंपळनेर(जि. धुळे); पुढारी वृत्तसेवा -पिंपळनेर तालुक्यातील चिकसे येथे दुपारी जोरदार वावटळी (भोवरी) आल्याने शेतकरी दीपक दत्तात्रय महाले यांच्या कुक्कुटपालनासाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याचे शेड उडून जमीनदोस्त झाले. यामध्ये दीपक महाले व त्यांची पत्नी सुरेखा महाले हे दांपत्य थोडक्यात बचावले.

दीपक महाले हे चिकसे-देशशिरवाडे-कडाळे शिवारालगत असलेल्या शेतात कुक्कुटपालनासाठी पत्र्याचे शेड उभारण्याचे काम करत होते. उभारणीचे काम पूर्णत्वास आले होते. आणखी एक दोन आठवड्यात त्यात ‘पक्षी’ टाकायची तयारी होती. मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवारात जोरदार वावटळ आल्याने पत्र्याचे शेड उडून जमीनदोस्त झाले.

135 फूट लांबी व 30 फूट रुंदीच्या सदर शेडसाठी वापरलेले लोखंडी पाईप, ऍंगल, जाळी यासह इतर काही लोखंडी साहित्य व पाच ते सहा पाण्याच्या टाक्या नुकसानग्रस्त झाल्या आहेत. आतापर्यंत साधारणतः पाच ते सहा लाख रुपये खर्च झालेला होता. काम जवळपास पूर्ण झाले होते मात्र तशातच नैसर्गिक आपत्तीमुळे दीपक महाले या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दीपक महाले व त्यांची पत्नी सुरेखा महाले हे दांपत्य त्या शेडमध्येच दुपारचे जेवण करत होते. मात्र अचानक शेड वरती उचलले गेले आणि खाली कोसळले. भांबवलेल्या अवस्थेत दोघेही चिंचाळतच बाहेर पळाले. बाहेर आल्यानंतर त्यांनी शेडचे झालेलं नुकसान पाहिले आणि त्यांनी टाहोच फोडला. लाखो रुपयांचा खर्च करून शेड बनवले आणि ते पूर्ण झाल्यानंतर अशी आपत्ती कोसळली. तशातच आपण दैव बलवत्तर म्हणून बचावलो म्हणून त्यांना दीड ते दोन तास रडू आवरेना.

शेड कोसळल्याचा मोठा आवाज आणि महाले दाम्पत्य मोठ्याने रडत असल्याचा आवाज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ऐकू गेल्यानंतर प्रवीण सूर्यवंशी, जितेश अहिरे, किशोर काळे हे तात्काळ शेडकडे धावले. त्यांनी महाले दाम्पत्याचे सांत्वन केले आणि मोठे नुकसान झाले असल्याबद्दल हळहळ व्यक्त केली. शेडखाली दबले जाऊन मोठी दुर्दैवी घटना घडली असती असे शेतकरी प्रवीण सूर्यवंशी, किशोर काळे व जितेश अहिरे यांच्यासह दीपक महालेचे वडील दत्तात्रय महाले व आई मिरा महाले यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या लाखो रुपयाच्या नुकसानीचा पंचनामा होऊन सदर शेतकऱ्यास शासकीय भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button