

विटा : पुढारी वृत्तसेवा : कोयनेचे पाणी बंद केल्यास सांगली जिल्ह्यातील शेतकरी धरणाचे दरवाजे तोडतील, असा इशारा सांगली जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख संजय विभूते यांनी दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहून आता तरी मौन सोडा, अशी मागणी केली आहे. Sangli News
मागील दोन महिन्यापासून कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यासंदर्भात गैरनियोजन सुरू आहे. परिणामी दीड महिन्यात चार वेळा कृष्णा नदी कोरडी पडली. परिणामी ताकारी, म्हैसाळ, टेंभू या उपसा सिंचन योजना बंद करण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे हा विषय सातारचे पालकमंत्री, सांगलीचे खासदार आणि आमदार यांनी स्वतः च्या प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातून परस्परांवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. Sangli News
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मौन बाळगून आहेत. त्यावर आज (दि.८) शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख विभूते आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकारांसमोर भूमिका मांडली. ते म्हणाले, आजवर अनेकदा कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. त्यावेळी कोणत्याही सातारच्या पालकमंत्र्यांनी पाणी अडविण्याची भूमिका घेतली नव्हती. सध्याचे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न एवढा प्रतिष्ठेचा का केलाय? हे समजत नाही, त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील खासदार संजय पाटील आणि पालकमंत्र्यांचे मित्र आमदार अनिल बाबर परस्परविरोधी वेगळी भूमिका घेतात, त्यामुळे त्यांच्यात मिलीभगत असल्याचा संशय येत आहे.
मुळात कोयना धरणातून कधी आणि किती पाणी सोडायचे हा विषय राजकीय नाही. तर कायदेशीर हक्काचा आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी अकारण विवाद करून पाणीटंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी इतर नेतेमंडळीं चा हस्तक्षेप थांबवून ठोस भूमिका जाहीर करावी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, असे पत्र आजच पाठविल्याचे मुळीक यांनी सांगितले.
शिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतूद कपात करून नव्याने पाणी वापर करण्याबाबत समितीने सुचविलेली पाणी कपात अन्यायकारक आहे, तसे या समितीला अधिकारच आहेत का?. वास्तविक १९६८ पासून २०१५ पर्यंत अनेकदा कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला, तरीही सांगली जिल्ह्याला कधीही पाणीटंचाई भासली नाही. कोणतीही योजना बंद पडली नाही. अगर वीज कपातही करावी लागलेली नाही. मग आताच का हा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे, याचे कोडे उलगडत नाही, असे मुळीक म्हणाले.
तर संजय विभुते म्हणाले की, वास्तविक कोयना धरणाच्या पाण्यावर सातारा जिल्ह्यातील पाणी योजना अवलंबून नाहीत.
यापूर्वीही धरणातील पाणीसाठा अनेकदा कमी झाला होता. परंतु असा कोणताही निर्णय तत्कालीन पालकमंत्र्यांनी घेतला नाही. शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा इतका पुळका असेल, तर त्यांनी सातारा जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.
कोयनेचे पाणी सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रकार झाल्यास सांगली जिल्ह्यातील शेतकरी कोयना धरणाचे दरवाजे तोडून टाकतील. त्यामुळे जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याची जबाबदारी सरकारसह मंत्री शंभूराज देसाई यांची असेल, असा इशारा विभुते यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर, किसनराव जानकर, शहराध्यक्ष विशाल पाटील, अॅड. संदीप मुळीक, महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील, प्रा. संतोष जाधव, महेश फडतरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा