Drug case : ड्रग्ज प्रकरणातील नाईकवाडे भोपाळमधून ताब्यात, अनेक धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता | पुढारी

Drug case : ड्रग्ज प्रकरणातील नाईकवाडे भोपाळमधून ताब्यात, अनेक धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील जप्त केलेल्या एमडी प्रकरणात (Drug case) सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार अक्षय गणेश नाईकवाडे यास गुंडाविरोधी पथकाने मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ शहरातून ताब्यात घेतले. त्यामुळे या गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईकवाडे हा एमडी प्रकरणात सक्रीय होता.

नाशिकरोड पोलिसांनी सामनगाव येथे संशयित गणेश शर्मा याच्याकडून १२.५ ग्रॅम एमडी जप्त केले होते. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून या गुन्ह्यात दहाहून अधिक संशयितांची धरपकड केली आहे. तसेच एमडी तयार करण्यासाठी सोलापूर येथे उभारलेला कारखाना, गोदामही पोलिसांनी उध्वस्त करीत कोट्यवधी रुपयांचा एमडी, कच्चा माल, एमडी तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. तसेच या गुन्ह्यातील १५ संशयितांविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. (Drug case)

या गुन्ह्यातील नाईकवाडे हा मुख्य संशयितांपैकी एक असून तो फरार होता. तीन महिन्यांपासून तो गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्ये लपत होता. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाईकवाडे यास पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील अंमलदार प्रदीप ठाकरे यांनी नाईकवाडे याच्याकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेक्षणद्वारे माहिती मिळवून त्याचा भोपाळ येथील पत्ता शोधला. त्यानुसार पथकाने तातडीने भोपाळ गाठून अक्षय नाईकवाडे यास भोपाळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरील झोपडपट्टीमधील हॉटेल चंदेल येथून ताब्यात घेतले. त्यास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक मोहिते, पोलिस नाईक प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. (Drug case)

हेही वाचा :

Back to top button