शिरूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उद्या बैठक | पुढारी

शिरूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उद्या बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिरूरचे आमदार अशोक पवार उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या मेळाव्यात नुकतीच शिरूर आणि बारामती लोकसभेसंदर्भात घोषणा करण्यात आली. यामुळे सध्या राज्यात या दोन्ही मतदारसंघांची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवार गटाचे खासदार असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केला आहे. तेव्हापासून मतदारसंघातील उमेदवार कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील तातडीने शुक्रवारी शिरूर लोकसभेसाठी स्वतंत्र आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची आढावा बैठक, त्यानंतर पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध नियुक्त्यांचे पत्र वाटप करण्यात येणार आहे. दुपारी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती खेड तालुकाध्यक्ष हिरामन सातकर यांनी दिली. या बैठकीसाठी जिल्हा युवाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राजमाला देवेंद्र बुट्टे पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे उपस्थित राहणार आहेतर्.ें

आगामी लोकसभा व अन्य सर्व निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा व पूर्व तयारीसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

                      देवदत्त निकम, जिल्हा कार्याध्यक्ष,      -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

 

Back to top button