Nashik News : 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड  | पुढारी

Nashik News : 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड 

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवागेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस तसेच प्रचंड गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसला. ऐन काढणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक द्राक्षबागांत द्राक्षाचा खुडा होण्याआधीच शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक द्राक्ष बागायतदार वैतागून द्राक्षबागा तोडण्यावर भर देत आहेत.

६८ वर्षांच्या संपूर्ण आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही. १५ मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. कोरोनाने आम्हाला उजरू दिले नाही, द्राक्षाने घात केला, त्यातून कसाबसा बाहेर पडलो आणि पुन्हा द्राक्षासाठी ९-१० लाख रुपये खर्च केले. यंदा गारपिटीने ते पूर्ण पाण्यात गेले. आम्ही यंदा खूप स्वप्ने पाहिली होती. पण नियतीला मान्य नव्हती म्हणायचे. आता बाग ठेवून काही फायदा नाही, तोडलेली बरी. 68 वर्षांचे विश्वनाथ जगताप थरथरत्या हाताने द्राक्षबाग तोडण्यात पुन्हा मग्न झाले.

वाकी खुर्द येथील विश्वनाथ जगताप यांनी आपले संपूर्ण आयुष्य लासलगाव बाजार समितीत हमाली करून उदरनिर्वाह केला. तीन मुलांचे संगोपन करताना मुले शिकवली आणि त्यांनी आपल्या शेतात तीन एकर द्राक्षबाग लागवड केली. त्यामध्ये दोन एकर थॉमसन आणि एक एकर सोनाका हे द्राक्ष पीक घेतले. गेली दोन वर्षे कोविडमुळे १७ ते १८ लाख रुपयांचे वार्षिक नुकसान त्यांनी सोसले असून यंदा सुमारे नऊ लाख रुपये द्राक्षबागेवर खर्च केले.

द्राक्षबाग लागवड करून त्यांना फक्त ५ वर्षे झाली होती. अजून १५ वर्षे क्षमता असलेली चांगल्या दर्जाची बाग टिकविण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाइपलाइन करत बाग चांगल्या प्रकारे फुलवली होती. द्राक्षाचे घड यंदा जोमात लागल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खुड्याचे त्यांचे नियोजन होते. यंदा २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न झाल्यावर घराची चांगल्या प्रमाणात डागडुजी व नूतनीकरण, धाकट्या मुलाचे लग्न आणि कार घ्यायचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते.

गेल्या २ वर्षांपूर्वी सेवा सोसायटीचे संपूर्ण कर्ज परतफेड केल्याने यंदा कुठलेही कर्ज घेतलेले नव्हते. त्यामुळे चांगला पैसा हातात मिळेल, हे स्वप्न गारपिटीने स्वप्नच राहिले, असे जगताप हताशपणे सांगत होते. तीन एकर द्राक्षबाग पूर्णपणे हातातून गेल्याने त्यांनी ही बाग तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. घरातील तीन मुले व मजुरांच्या साहाय्याने त्यांनी सोमवारी (दि. 4) सकाळपासून ही बाग तोडण्यास सुरुवात केली. जी परिस्थिती जगताप यांची झाली, तशीच काहीशी परिस्थिती अनेक गावांमध्ये द्राक्ष उत्पादकांची झालेली आहे.

लाखो रुपये खर्चून एकरकमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या द्राक्षबागा यंदा गारपिटीने पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने अनेक द्राक्ष बागायतदारांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

Back to top button