एका वर्षात ‘महाराष्ट्र केसरी’चा षटकार; गटबाजीमुळे स्पर्धेचा दर्जा घसरला | पुढारी

एका वर्षात ‘महाराष्ट्र केसरी’चा षटकार; गटबाजीमुळे स्पर्धेचा दर्जा घसरला

विशाल गुजर

सातारा :  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व कुस्तीगीर संघ या दोन्ही कुस्ती संघटनेतील गटबाजीमुळे वर्षभरात तब्बल पाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या आहेत. डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात चंद्रपूरमध्ये महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्यामुळे एकाच वर्षात महाराष्ट्र केसरीने षटकार मारला आहे. गटबाजीमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दर्जा घसरू लागला आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत एकच स्पर्धा भरवावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांनी केली आहे.

सातारा जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. दोन गटाकडून स्पर्धा होत असल्याने गतवर्षापासून दोन महाराष्ट्र केसरी होत आहेत. 2023 साली पुण्यात मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली होती. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने मार्च महिन्यात सांगली येथे पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली. कुस्तीगीर संघाने देखील एप्रिल महिन्यात कोल्हापुरात पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. दोन्ही संघटनांनी आपलीच स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केला आहे. दोन स्पर्धेत वेगवेगळ्या महिलांनी किताब जिंकला त्यामुळे खरी महिला महाराष्ट्र केसरी कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. तीच स्थिती पुरुष गटाची आहे.आता एकाच वर्षात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी किताब विजेते होणार आहेत. इतिहासात प्रथमच एका वर्षात सहा महाराष्ट्र केसरी किताब विजेते झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शासनमान्यता अन् गदाचे आकर्षण

महाराष्ट्र केसरी किताबाला फार मोठा सन्मान आहे. कुस्ती संघटक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने मानाची चांंदीची गदा विजेत्याला दिली जाते. येथे पैशाचे मोल नसते. याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला शासनाची मान्यता आहे. विजेत्याला शासकीय मानधन, बक्षिसे, शासकीय सोयी-सवलती, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य येथे उपस्थित राहून विजेत्याचा सन्मान करतात. अलीकडे दोन संघटनांतील वादामुळे या स्पर्धेला वादाची झालर लागली आहे.

गटातील वादांमुळे कुस्ती वेठीस

खरे पाहता पुणे जिल्हा संघटनेतील ़ वाद आहे. त्याचा फटका राज्यातील कुस्तीगीरांना बसत आहे. वर्षानुवर्षे अनेक मल्ल जीवापाड कष्ट घेऊन सराव करतात. या वादामुळे कुस्ती वेठीस धरली जात आहे. महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धा दोन दोनदा होत असल्याने नवोदितांचे नुकसान होत आहे. कोणती स्पर्धा अधिकृत समजायची? असा संभ्रम मल्लांच्या मनात निर्माण झाला आहे.

लढाई न्यायालयीन आखाड्यातही

कुस्तीगीरांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद एकमेव संघटना स्व. मामासाहेब मोहोळ, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केली. सुरळीत चाललेल्या संघटनेत पुणे जिल्ह्यात वादाची ठिणगी पडली. दोन गट निर्माण झाल्यामुळे खरे-खोटे ठरवण्यासाठी लढाई न्यायालयाच्या आखाड्यात जाऊन पोहचली आहे. दोन्ही गटांचे डोळे न्यायालयीन लढाईकडे लागले आहेत.

आता बैलगाडी शर्यतीत महाराष्ट्र केसरी

कुस्ती क्षेत्रात खुल्या गटातील विजेत्यांना महाराष्ट्र केसरी किताबाने गौरवण्यात येते. महाराष्ट्र केसरी एकमेव किताब असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अलीकडे कुस्ती क्षेत्रातच गल्ली बोळात केसरी किताबाच्या स्पर्धा होत आहेत. कुस्तीबरोबर आता बैलगाडी शर्यतीत देखील महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताब देण्यात येत आहेत. पुढच्या काळात श्वान स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब दिला तर आश्चर्य वाटायला नको.

Back to top button