Dhule News : महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांचा दंडुका | पुढारी

Dhule News : महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांना पोलिसांचा दंडुका

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात महाविद्यालया परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. आज दामिनी पथकाच्या माध्यमातून 381 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गेल्या आठवड्यापासून महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणारे आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर बडगा उभारल्याने समाधानाची प्रतिक्रिया उमटते आहे.

धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांजवळ मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य वस्तूंची विक्री होते. तसेच टवाळखोरांच्या माध्यमातून नियमित शिस्त पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्रास होतो. या तक्रारी नित्याची बाब आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी टवाळखोरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यासाठी दामिनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दामिनी पथकाने काल धुळे शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या परिसरात मोहीम राबवली. यात नियम भंग करणाऱ्या 381 टवाळखोरांवर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई देखील करण्यात आली.

तर महाविद्यालयात विना गणवेश येणारे विद्यार्थी तसेच ओळखपत्र न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनाच्या माध्यमातून सक्षम देश निर्माण करण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्याच आठवड्यात महाविद्यालय परिसरात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमण करून टपरीवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर देखील अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button