Lasalgaon Railway : ..अन् लासलगावकरांच्या काळजाचा चुकला ठोका | पुढारी

Lasalgaon Railway : ..अन् लासलगावकरांच्या काळजाचा चुकला ठोका

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथे गुरुवारी (दि.30) दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे गेटमधून विंचूरच्या दिशेने जाणारा मालट्रक रेल्वे रुळावर येताच अचानक बंद पडला. या रुळावरून काही मिनिटांतच सुपरफास्ट एक्स्प्रेस येण्याची वेळ झाली होती. त्यात ट्रक बंद पडून रुळांमध्ये अडकल्याने चालकाने अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. यामुळे येथे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

रेल्वे गेटवर उपस्थित उपनिरीक्षक प्रशांत गवई, स्टेशन मास्टर दिव्य ज्योती पांडे, सह उपनिरीक्षक रशिद खान, कॉन्स्टेबल सचिन गवई, गेटमन सचिन इंगळे, कीमन अनिल कांबळे, ट्रॅकमन सुरेश सानप यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने ट्रकला धक्का देत गेटच्या बाहेर काढले. सुदैवाने याचवेळी ट्रक सुरू झाला अन् सुपरफास्ट गाडी येण्याआधी ट्रक बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. सकाळपासून लासलगाव पोलिस व रेल्वे पोलिस रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्तव्य बजावत होते.

वाहनांच्या एक-दीड किमी रांगा (Lasalgaon Railway)

मनमाड येथील ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिजचा काही भाग ढासळल्यामुळे पुणे-इंदोर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. यामुळे वाहतूक मालेगाव व नगरकडे जाणाऱ्या गाड्या मनमाड व्हाया लासलगाव, विंचूर, येवला, नगर याप्रमाणे तर येवला मनमाड येथे येणाऱ्या येवला, विंचूर, लासलगाव व्हाया विंचूर-मालेगाव अशा प्रकारे रस्ता वाहतूक बदल केल्यामुळे लासलगाव शहरातून जाणारा मनमाड व चांदवडकडे जाणाऱ्या मार्गावरील लासलगाव रेल्वे गेटवर वाहनांची वर्दळ वाढून एक ते दीड किलोमीटर लांबच लांब रांगा लागत आहेत.

हेही वाचा :

Back to top button