पुढारी ऑनलाईन : तेलंगणात गुरुवारी मतदान होण्याच्या काही तास आधी मध्यरात्री आंध्र प्रदेश सरकारने मोठी खेळी खेळली. त्यांनी कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरणाच्या अर्ध्या भागावर ताबा मिळवला आणि त्याच्या बाजूला पाणी सोडले. २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणात धरणाच्या पाण्यावरुन वाद सुरू आहेत. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. (Krishna Water Dispute)
या वृत्तानुसार, तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारने कृष्णा नदी व्यवस्थापन मंडळाकडे (KRMB) तक्रार केली आहे. त्यात आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकारने धरणावर कब्जा केल्याचा आणि काही भागांवर बॅरिकेड्स लावल्याचा आरोप केला आहे. कृष्णा नदी व्यवस्थापन मंडळाकडून दोन्ही राज्यांना पाण्याचे वाटप केले जाते.
संबंधित बातम्या
आंध्र प्रदेशातील सुमारे ४०० पोलिस कर्मचारी राज्य पाटबंधारे अधिकार्यांसह गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास धरणावर गेले आणि त्यांनी तेलंगणा पोलिसांना गाफील ठेवून धरणाचे अर्ध्या म्हणजेच ३६ दरवाज्यांवर ताबा मिळवला.
जेव्हा तेलंगणाचे अधिकारी आणि नलगोंडा येथील काही पोलीस धरणावर आले तेव्हा आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. पण आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी ते त्यांच्या सरकारच्या निर्देशानुसार कर्तव्ये पार पाडत असल्याचे सांगितल्यानंतर तेलंगणाचे अधिकारी, पोलिस अधिकारी तेथून माघारी फिरले. (Krishna Water Dispute)
आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांनीदेखील तेलंगणातील वाहनांना राज्याच्या पत्त्यांसह आधार कार्ड दाखवल्याशिवाय परवानगी दिली नाही. तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशने असाच प्रयत्न केला होता. पण तो त्यांनी हाणून पाडला होता.
"आम्हाला माहिती मिळाली होती की आंध्र प्रदेश सरकार १० हजार क्युसेक पाणी सोडत आहे. त्यांनी रेग्युलेटर गेट्ससाठी स्वतंत्र पॉवर लाइन उपलब्ध करून दिली आहे. याचा अर्थ आंध्र प्रदेशने गेल्या काही आठवड्यांपासूनच याची योजना आखली होती. त्यांनी धरणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वयंचलित प्रवेशद्वाराचे नुकसान केले आहे," असे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.