दूध दरासाठी प्रहारचे एरंडगाव बुद्रुक येथे दुग्धाभिषेक आंदोलन | पुढारी

दूध दरासाठी प्रहारचे एरंडगाव बुद्रुक येथे दुग्धाभिषेक आंदोलन

येवला (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : ढासळलेल्या दूध दराबाबत सरकारला जाग आणण्यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथे प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री यांच्या प्रतिमांवर दुग्धाभिषेक आंदोलन केले.

सध्या दुधाचे दर नीचांकी घसरले असून सध्या दुधाला २२ ते २५ रुपये दर मिळत आहे. त्यातून दुष्काळी परिस्थितीत महागलेला चारा आणि पशुखाद्याच्या महागलेल्या किंमतीमुळे पशुपालकांचा उत्पादन खर्च ही भरून निघत नसल्याने तो हवालदिल झाला आहे.

दुग्ध व्यवसाय तसा शेतकऱ्यांच्या ताजा पैसा देणारा व्यवसाय म्हणून शेतकरी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरला असला तरी कोरडा, हिरवा चारा, पशुखाद्य, पूरक खाद्य, मोठ्या प्रमाणात होणारा वैद्यकीय खर्च आणि सध्या मिळणारा दर बघता इतर वेळेस नफा म्हणून उरणार शेण सुद्धा सध्याच्या दरा मुळे उरत नसल्याने सरकारला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतंय.

या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून जोरदार घोषणाबाजी केली.

या केल्या मागण्या…

या आंदोलनाचे निवेदन प्रहारचे तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन यांनी दिले. निवेदनात त्यांनी सरकारला विनंती केली की, बनावट दुध उत्पादनास कठोर कारवाई करावी. ३.५ आणि ८.५ ला ४० रुपये दर देण्यात यावा. पशुखाद्याचे भाव नियंत्रित करावे. दूध संघांमध्ये फॅट आणि SNF कमी केले जात असून त्यावर नियंत्रण आणावे. केंद्र शासनाने दूध पावडर आयात त्वरित थांबवावी.

असे न केल्यास प्रहार शेतकरी संघटना दूध विकास मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करेल, असा इशारा यावेळी  तालुकाध्यक्ष हरीभाऊ महाजन यांनी दिला.

हेही वाचा :

Back to top button