गोदावरी नदीच्या महतीसाठी तीनशेहून अधिक साधू करणार उगम ते संगम परिक्रमा | पुढारी

गोदावरी नदीच्या महतीसाठी तीनशेहून अधिक साधू करणार उगम ते संगम परिक्रमा

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीचा जन्म हा गंगा नदीच्या आधी झाल्याचे मानले जाते. तसेच गोदेच्या काठावर नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असतो. दक्षिण गंगा म्हणून नदी मानली जात असल्याने, ती कायम शुद्ध व निर्मळ वाहायला पाहिजे. याकरिता नर्मदा परिक्रमाप्रमाणे गोदा परिक्रमेला वैष्णव संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. गोदावरी नदीच्या महतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी तीनशेहून अधिक साधू, महंत ३ डिसेंबर रोजी गोदावरी नदीचा उगम ते संगम परिक्रमा करणार असल्याची माहिती पंचमुखी हनुमान मंदिराचे प्रमुख महंत भक्तीचरणदास महाराज यांनी दिली.

या परिक्रमेचे आयोजन टीलाद्वाराचार्य मंगलपीठाधिश्वर यज्ञसम्राट श्री श्री १००८ श्री महंत श्री माधवाचार्य महाराज यांनी केले आहे. रविवार (दि. ३) डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्रंबकेश्वर येथील गोदावरी उगमस्थान व कुशावर्त येथे संकल्प पूजन, ध्वज पूजन करून गोदावरी नदी परिक्रमेला सुरवात होणार आहे. यानंतर सकाळी ११ वाजता जुना आडगाव नाका येथील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात परिक्रमेत सहभागी सर्व साधू महंत यांचे स्वागत करण्यात येणार आहे. (दि. १२) डिसेंबरपर्यंत ही परिक्रमा सुरू राहणार असून, १३ डिसेंबर रोजी पुन्हा त्रंबकेश्वर येथे पोहचल्यावर गोदावरी परिक्रमेची सांगता केली जाणार आहे.

गोदावरी नदी न ओलांडता व नदीच्या काठाने मार्गक्रमण करीत जवळपास ३ हजार ५०० किमीचे अंतर दहा दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. साधू, महंत यांनी एकत्र येऊन अशा प्रकारे गोदावरी नदी परिक्रमेचे प्रथमच आयोजन केले जात आहे. ही परिक्रमा पाच ते सहा राज्यातून होणार असल्याने, त्या त्या राज्यातील सरकारने सहभागी साधू, संत, महंत यांच्या वाहन ताफ्याला संरक्षण देण्यासाठी सहमती दर्शविली आहे. भारतातून वेगवेगळ्या प्रांतातील जवळपास ३५० साधू, संत, महंत या परिक्रमेत सहभागी होणार आहेत. दि ८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता समुद्र मार्गे छिन्नलंका येथे गोदावरी नदीच समुद्रात संगम होतो त्याठिकाणी विधिवत पूजा अर्चा केली जाणार आहे.

चंद्रभागेच्या काठी होणार कार्यक्रम

गोदावरी परिक्रमा झाल्यानंतर हे सर्व साधू, महंत विश्व कल्याणार्थ नऊ कुंडात्मक विष्णू महायज्ञ, हनुमान चालीसा व संत समागम याकरिता पंढरपूर येथे जाणार आहेत. १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत चंद्रभागा नदीच्या काठावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वैष्णव संप्रदायात गोदावरी परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रथमच साधू, संत, महंत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी परिक्रमा करीत आहेत. याचे सर्व नियोजन झाले असून, परिक्रमेच्या कालावधीत रोज सायंकाळी त्या त्या ठिकाणी गोदा आरती केली जाणार आहे. नदी ओलांडायची नसल्याने जाताना वेगळा मार्ग व येताना वेगळा मार्ग आहे.

– महंत भक्तीचरणदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिर

हेही वाचा :

Back to top button