एकटेपणा हा रोज पंधरा सिगारेट ओढण्याइतकाच घातक! | पुढारी

एकटेपणा हा रोज पंधरा सिगारेट ओढण्याइतकाच घातक!

वॉशिंग्टन : विशिष्ट ध्येयासाठी स्वतः स्वीकारलेला एकांतवास वेगळा आणि लादलेला भयाण एकाकीपणा वेगळा. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे असा एकाकीपणा खायला उठू शकतो. जगभरात एकटेपणाच्या वाढत्या समस्येमुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. एकटेपणाचा संबंध विविध आरोग्य समस्यांच्या वाढीव जोखमांशी आहे. नैराश्य, चिंता आणि आत्महत्या यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या यामध्ये प्रमुख आहेत. याने होणार्‍या मृत्युदरावरील परिणाम दिवसातून 15 सिगारेट ओढण्याइतका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकटेपणाला ‘जागतिक सार्वजनिक आरोग्य चिंता’ म्हणून घोषित केले आहे.

कोरोना महामारीनंतर जगभरात एकटेपणाची समस्या वाढली आहे. अमेरिकन तज्ज्ञ विवेक मूर्ती म्हणतात की, लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आजारांपेक्षा एकाकीपणाचा धोका अधिक घातक आहे. जगभरातील प्रत्येक चौथा वृद्ध एकाकीपणाच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे मानसिक दडपण वाढले आहे. एकाकीपणामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका वृद्धांमध्ये 50 टक्के जास्त असतो. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका 30 टक्के वाढतो. शाळेत एकटेपणा अनुभवणारे तरुण विद्यापीठातून बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते. वेगळेपणा जाणवल्याने नोकरीतील समाधान आणि कामगिरी कमी होऊ शकते. कुटुंबातही कलह होतो.

आर्थिक आव्हाने, महागाई आणि बेरोजगारी ही लोकांच्या सामाजिक दुरावा किंवा एकाकीपणाच्या वाढत्या समस्येमागील प्रमुख कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, शांतता, सुरक्षा आणि हवामान संकट तसेच उच्च पातळीची बेरोजगारी, आफ्रिकेतील सामाजिक एकाकीपणात योगदान देत आहेत. एकटेपणामुळे 5 गंभीर आजारांचा धोका वाढतो. यात उदासीनता, सामाजिक चिंता म्हणजेच संवाद साधण्यात अडचण यांचा समावेश होतो. कर्करोग, मधुमेह आणि स्किझोफ्रेनियाचा धोका वाढतो.

Back to top button