नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात रविवारी (दि.२६) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८९० गावांमधील ३२ हजार ८३३ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. निफाड, चांदवड, नांदगाव, इगतपुरी व दिंडोरी या पाच तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. द्राक्ष, कांदा व भातपिकासह अन्य भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले असून, ६७ हजार ८६६ शेतकरी बाधित झाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल व कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. (Nashik Heavy Rain)
अरबी समुद्रामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. रविवारी अवघ्या जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. या पावसामध्ये जिवापाड जपलेल्या द्राक्षबागांसह कांदा, भातशेती, टोमॅटो, गहू व अन्य पिके डोळ्यादेखत कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. सोमवारी (दि.२७) पावसाने उघडीप दिल्यानंतर शासकीय यंत्रणांनी प्राथमिक पाहणी केली असता त्यामध्ये ३२ हजार ८३३ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळीचा सर्वात जास्त नुकसान झाले असून, ९,२९४ हेक्टरवरील द्राक्ष, मका, गहू, कांदा, ऊस तसेच भाजीपाला मातीमोल झाला. दरम्यान, जिल्ह्यामध्ये एकूण ११ हजार ५९७ हेक्टरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. त्या खालोखाल कांदापिकाचे नुकसान झाले असून, तब्बल १० हजार ८७६ हेक्टरवरील पिके व रोपवाटिका बाधित झाल्या आहेत. तसेच ६ हजार ७०३ हेक्टरवरील भात, २२८३ हेक्टर भाजीपाला, ५७८ गहू, ३१० हेक्टर टोमॅटो, १६९ हेक्टर मका, २२१ हेक्टर ऊस झोपला आहे. याशिवाय सोयाबीन, डाळिंब, सीताफळ व अन्य पिकेही अवकाळीच्या तडाख्यात सापडली आहेत. त्यामुळे पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने अगोदर संकटात असलेल्या बळीराजाचा पाय अवकाळी व गारपिटीने अधिक खोलात गेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक स्तरावर महसूल व कृषी विभागाने पंचनाम्यांची कामे हाती घेतली आहेत. पण अनेक शेतांमध्ये सध्या गुडघाभर पाणी कायम असल्याने पंचनाम्यांना अडचणी येत आहेत. एकूणच अवकाळी व गारपिटीने दिलेला तडाखा बघता नुकसानीचे आकडे वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
प्राथमिक नुकसान (हेक्टर)
सटाणा ५७०, नांदगाव ३२५३, कळवण ७७३, दिंडोरी २९६४, सुरगाणा २२५, नाशिक ८६८, त्र्यंबकेश्वर २२८, पेठ ५५६, इगतपुरी ५९२०, निफाड ९२९४, सिन्नर ३८, चांदवड ७५७७, येवला ५६५, एकूण ३२८३३.
जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे शेतीपिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल व कृषी विभागाकडून बांधावर जाऊन शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.
– राजेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक
शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ विमा कंपनीला कळवावे. किंवा नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात अर्ज करत त्यासोबत विम्याची पावती जोडावी. जेणेकरुन शासनस्तरावरून मदत करण्यास सोयीचे होईल. कृषी विभागातर्फे दौरे सुरु असून जिल्ह्यातून माहिती घेतली जात आहे.
-विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक.
हेही वाचा :