सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरील परतीचे विमान रद्द झाल्याने गोंधळ, मुंबईला जाणा-या प्रवाशांची गैरसोय | पुढारी

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरील परतीचे विमान रद्द झाल्याने गोंधळ, मुंबईला जाणा-या प्रवाशांची गैरसोय

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : चिपी परूळे (ता.वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर सायंकाळी 4.30 वाजता मुंबईहून प्रवाशांना घेऊन येणारे विमान सोमवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता दाखल झाले. मात्र चिपी येथून मुंबईला जाणारे परतीचे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे मुंबईला जाणा-या प्रवाशांची गैरसोय झाली. जवळपास 40 हून अधिक प्रवाशी मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. परंतू 6 नंतर चिपी विमानतळावर विमान उड्डाणाला परवानगी नसल्याने परतीचे विमान रद्द करण्यात आल्याने संतप्त प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान या वादानंतर मंगळवार सकाळी 10 वाजता घेऊन जाऊ अशी ग्वाही विमानतळ प्रशासनाने दिली त्यानंतर प्रवाशी माघारी परतल्याचे समजते.

वेंगुर्ला चिपी विमानतळावरील विमानसेवा रामभरोसे असल्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा प्रवाशांना आला. मुंबईहून चिपी विमानतळावर सायंकाळी साडेचार वाजता येणारे विमान सोमवारी दिड तास विलंबाने सहा वाजता दाखल झाले. परंतू उशिर झाल्याने परतीचे विमान टेक ऑफ घेऊ शकले नाही. परतीची विमानसेवा अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे मुंबईला विमानाने जाण्यासाठी चिपी विमानतळावर आलेल्या जवळपास 40 हून अधिक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. या प्रवाशांनी संतप्त होत विमानतळ प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. सायंकाळी उशिरापर्यंत संतप्त प्रवाशी विमानतळावर ठाण मांडून होते.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबर रोजी साजरा होणा-या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावर नाईट लॅन्डिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. दिल्ली येथील डिझीसीएचे पथक चिपी विमानतळावर येऊन पाहणी करून याठिकाणी नाईट लॅण्डींग सेवेला परवानगी देणार आहे. परंतू अद्याप डिझीसीए परवानगी प्रतिक्षेत आहे. त्यामुळे नाईट लॅण्डींग यंत्रणा बनवूनही रात्रीच्या वेळी विमान टेक ऑफ घेऊ शकत नाही. लवकरच नाईट लॅण्डींगला परवानगी मिळून नाईट लॅण्डींग विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

Back to top button