Nashik News : खडक माळेगाव धरणात ‘ब्राह्मणी डक”चे आगमन,

Nashik News : खडक माळेगाव धरणात ‘ब्राह्मणी डक”चे आगमन,
Published on
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील खडक माळेगाव धरणावर हिवाळ्याची चाहूल लागताच बदक प्रजातीमधील ब्राह्मणी डक या जोड्या दिसू लागल्याने परिसरातील पक्षी अभ्यासक व पक्षिमित्रांना पक्षीनिरीक्षणाची पर्वणी मिळाली आहे.

निफाड तालुक्याचे प्रसिद्ध असलेले प्रतिभरतपूर म्हणून नांदूरमधमेश्वर येथे हिवाळ्यात परदेशी पाहुण्यांचे आगमन होते. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात खडक माळेगाव येथील धरणावर पक्षिमित्र अभ्यासकांना यावेळी "ब्राह्मणी डक" जोड्या बघावयास मिळाल्या आहेत. ब्राह्मणी डक याला 'रूडी शेल डक' असेही संबोधतात. या स्थलांतरित बदकांना मराठीत चक्रवाक, चकवा, सोनेरी बदक अशा नावानेही संबोधतात.

आकाराने मोठ्या बदकाएवढ्या असलेल्या या पक्ष्याला निसर्गाने मनमोहक रंग बहाल केल्यामुळे ही बदकांची जोडी रुबाबदार वाटते. जोडीजोडीने ही बदके हिवाळ्यात अनेक किलोमीटरचा प्रवास करून भारत भ्रमंतीवर येतात. यांचे प्रमुख खाद्य म्हणजे पानवनस्पतीची कोवळी पाने, किडे, खोड, गोगलगायी, शिंपल्यातील मृदुकाय सूक्ष्मजीव, छोटे मासे, बेडकांची पिल्ले यासह काठावरील चिखलातील कृमी, कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

दरवर्षी या बदकांच्या जोड्या एप्रिल ते जून दरम्यान वीण घालण्यासाठी हिमालय व आसपासच्या नेपाळ, तिबेट व लडाख परिसरातील सरोवरात एकवटतात. हिवाळ्यात ही बदके आपल्या पिलांसह भारत भ्रमंतीवर येतात व देशभर विखुरले जातात. विशेष म्हणजे प्रियाराधनेत तरबेज पक्षी म्हणून या पक्षाकडे बघितले जाते. अनेक वेळा या पक्ष्यांचा उल्लेख साहित्यातूनही केला गेला आहे.

खडक माळेगावच्या धरण परिसरात या पक्ष्याबरोबर पानकावळा, टिबुकली, राखी बगळा, जांभळा बगळा, गाय बगळा, चित्र बलाक, उघड्या चोचीचा बलाक, विविध रंगांचे सराटी, पांढऱ्या छातीची पानकोंबडी, मोठा खंड्या, चातक, पिंगळा, हळद्या, देव ससाणा इत्यादी पक्षीही आढळत असल्याचे पक्षिमित्रांनी सांगितले.

आयुष्यभर एकनिष्ठता

या बदकांच्या जोडीचे विशेष म्हणजे एकदा जमलेली आयुष्यभराची जोडी एकनिष्ठेने संगत निभावतात. जोडीतील एकाचा जरी मृत्यू झाला तर दुसरा साथीदार विरह वेदनेने मृत्यू पत्करतो. या पक्ष्यांचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केला गेला आहे.

खडक माळेगाव धरणात पाणवठ्यावर सध्या ब्राह्मणी डक पक्ष्यांच्या काही जोड्या दिसून आल्या आहेत. हिवाळी मोसमाला सुरुवात झाल्यानंतर परदेशी व देशांतर्गत पक्ष्यांचे थवे दाखल होतात. जलाशयामध्ये मुबलक अन्न व सुरक्षित वातावरण यामुळे "ब्राह्मणी डक" येथे आढळून आले आहे. पक्षी अभ्यासासाठी समाधानकारक चित्र आहे.

-किशोर वडनेरे, पक्षीअभ्यासक

स्थलांतरित बदके चक्रवाक किंवा "ब्राह्मणी डक" या नावाने परिचित आहेत. सकाळी व संध्याकाळी धरणाच्या काठावरील चिखलात सध्या जोडीने बरोबर इतर पक्षीही बघावयास मिळतात.

-प्रमोद महानुभाव, पक्षिमित्र, लासलगाव

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news