नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्याच्या सुवर्ण त्रिकोणात नाशिकला महत्त्वाचे स्थान असले, तरी कुपोषणाची येथील समस्या मोठी आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध साधनांद्वारे पाच वर्षांचा कृती कार्यक्रम हाती घेत जिल्हा कुपोषणमुक्त करावा, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे शासन विविध योजना घेऊन आपल्या दारी पोहोचले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील मोडाळे व कुशेगाव येथे मंगळवारी (दि. २१) महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या महाशिबिरास राज्यपालांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात राज्यपाल बैस म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी बांधवांचे योगदान मोठे आहे. पण आदिवासींचा हा इतिहास सोयीस्कररीत्या लपवून ठेवण्यात आल्याने कालौघात तो लुप्त पावत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून दि. १५ नोव्हेंबरला जनजाती दिनी विकसित भारत संकल्प यात्रेतून इतिहासाला उजाळा देण्याचे महान कार्य करण्यात आले. ही यात्रा म्हणजे देशासाठी योगदान देणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी नमन करण्याचा उद्देश असल्याचे बैस यांनी सांगितले.
लाभार्थींना लाभाचे वाटप
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मोडाळे व कुशेगावसह पंचक्रोशीतील लाभार्थींना उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आरोग्य विभागाच्या स्तनदा माता व बेबी किट, क्रीडा, कृषी तसेच अन्य योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा :