अडकलेल्या मजुरांशी व्हिडीओ संपर्क साधण्यात यश; दहा दिवसांनी दिसले 41 जणांचे चेहरे | पुढारी

अडकलेल्या मजुरांशी व्हिडीओ संपर्क साधण्यात यश; दहा दिवसांनी दिसले 41 जणांचे चेहरे

रुद्रप्रयाग; वृत्तसंस्था : उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 जणांशी तब्बल 10 दिवसांनी व्हिडीओ संपर्क साधण्यात बचाव पथकाला मंगळवारी पहाटे यश आले. हे सर्वजण सुखरूप असल्याचे दिसल्यावर सर्वांनाच हायसे वाटले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांत आता अधिक उत्साह संचारला आहे.

सोमवारी 153 मीटर लांबीचा व सहा इंच रुंदीचा पाईल सारे ढिगारे भेदून अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचला. त्यानंतर या पाईपमधून एक कॅमेरा व वॉकीटॉकी पाठवण्यात आली. ती पहाटेच्या सुमारास आत पलीकडच्या टोकाला यशस्वी पोहोचली. यानंतर पहाटे पावणेचारच्या सुमारास अडकलेल्या मजुरांसोबत व्हिडीओ संवाद झाला.

आत पाठवलेल्या वॉकीटॉकीवर बाहेरच्या बचाव पथकाने त्यांना कॅमेरा व वॉकीटॉकी पोहोचले असल्यास कॅमेर्‍यासमोर या आणि स्माईल करा, असे आवाहन केले. त्यानंतर आत अडकलेले मजूर एक एक करून कॅमेर्‍यासमोर आले. बाहेरच्या पथकाने त्यांना तुमचे चेहरे आम्हाला दिसत आहेत, असे सांगत तुम्ही सगळे ठीक आहात का, असे विचारले. अडकलेल्या मजुरांनी लवकरात लवकर बाहेर काढा, अशी विनंती केली. त्यावर पथकाने त्यांना काळजी करू नका, लवकरच तुमची सुटका करू, असा विश्वास दिला. यानंतर या सर्व मजुरांना वॉकीटॉकी कशी वापरायची याची सूचना देण्यात आली. त्याशिवाय या मजुरांना लवकरच या पाईपच्या मार्गे खिचडी, दलिया आणि काही औषधे पाठवली जातील, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना खिचडी व पाण्याच्या बाटल्या पाठवल्या गेल्या. अडकलेल्या मजुरांनी तब्बल दहा दिवसांनी भरपेट खिचडी खाल्ली.

बचाव कार्यात सनसनाटी नको

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेच्या प्रयत्नांच्या बातम्या देताना विनाकारण सनसनाटी बातम्या देऊ नका, असे निर्देश सरकारने खासगी वृत्तवाहिन्यांना दिले आहेत. याबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वृत्तवाहिन्यांची शीर्षके आणि व्हिडीओमुळे अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांत चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार होते. त्यामुळे असे वार्तांकन करू नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Back to top button