नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गांतील मंजूर ७०८२ पैकी सुमारे २८०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रचंड ताण येत आहे. महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाला अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. शासनाच्या निर्देशांनुसार नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
दरम्यान, अग्निशमन विभागातील ३४८, तर आरोग्य-वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार टीसीएसमार्फत ही नोकरभरती प्रक्रिया राबविली जात आहे. टीसीएसला ब ते ड संवर्गातील पदभरतीचा अधिकार आहे. त्यामुळे मंजूर असूनही अ संवर्गातील ८२ डॉक्टरांच्या पदभरतीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. भरतीसाठी टीसीएसमवेत मनपाने करार केल्यानंतर भरतीसाठी आवश्यक संगणकीय प्रणाली, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम प्रकल्प व्यवस्थापकाकडून (प्रोजेक्ट मॅनेजर) पूर्ण करण्यात आले आहे. टीसीएसच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याने टीसीएस व मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. यात आढावा घेण्यात आला असून, लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभागांतील मंजूर पदांच्या भरतीसंदर्भात टीसीएसच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. भरती प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
– लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (प्रशासन), मनपा.
हेही वाचा :