Crime News : वाईन शॉपीवर सशस्त्र दरोडा; रोकड लंपास | पुढारी

Crime News : वाईन शॉपीवर सशस्त्र दरोडा; रोकड लंपास

पुणे/ वारजे : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यात नागरिक दंग असताना ऐन वर्दळीच्या वेळी उत्तमनगर येथील आर. आर. वाईन्स शॉपीवर पाच ते सहा जणांनी कोयता, तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला. त्यानंतर गल्ल्यातील रोकड, दारूच्या बाटल्या असा 3 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेनऊ वाजता उत्तमनगर परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे दरोडा पडलेली वाईन शॉपी आणि उत्तमनगर पोलिस ठाण्यामध्ये हाकेचे अंतर आहे.

याप्रकरणी मनोज बाळासाहेब मोरे, (वय 33, रा. कृष्णा रेसिडन्सी, कोंढवे-धावडे पुणे) यांनी उत्तमनगर पोलिसात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर येथील मनीषा थिएटरजवळील आर. आर. वाईन्स हे दारूचे दुकान आहे. फिर्यादी मोरे हे वाईन्स शॉपमध्ये ग्राहकाला दारू देत असताना दुचाकीवरून दरोडेखोर आले. त्यांच्याकडे पिस्तूल आणि कोयता होता. त्यातील काहीजण आत आले तर काहीजण बाहेर थांबले.

आत प्रवेश केलेल्या दरोडेखोरांनी तलवार काढून काऊंटरवरून उडी मारून आत प्रवेश करीत रोख रक्कम काढून घेतली. तसेच दोन दारूच्या बाटल्या पिशवीत भरून शिवणे परिसराकडे पसार झाले. बाहेर पळ काढता त्यांनी तलवारीने धाक दाखवत कोणीमध्ये आले, तर त्याला मारून टाकू, असे म्हणत दहशत निर्माण केली. या वेळी घाबरलेल्या कामगार व ग्राहकांनी घाबरून दुकानाबाहेर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे, सुनील तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत.

हेही वाचा

अत्यल्प पावसामुळे मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ

Pune News : कल्व्हर्ट, पूल झाले अनधिकृत पार्किंग

Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा

Back to top button