नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सारडा सर्कल परिसरात वाहतूक बेटाजवळ मारुती ओम्नी व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २१) सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करीत आग विझवली. मात्र आग इतकी भीषण होती की आगीत व्हॅन भस्मसात झाली. धावत्या वाहनास आग लागल्याने परिसरात काही वेळ घबराट पसरली होती. तसेच आगीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.
शहरातील सारडा सर्कल परिसर नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या परिसरातून शहरातील इतर मुख्य भागांमध्ये ये-जा करता येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची असते. दरम्यान, आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सारडा सर्कल वाहतूक बेटाला वळसा घालून एमएच १८ डब्ल्यू ३७१८ क्रमांकाची व्हॅन नॅशनल उर्दु शाळेच्या दिशेने जात होती. त्यावेळी व्हॅनमधून धुर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्हॅन चालक गणेश भोळे यांनी व्हॅन थांबवून आतील सदस्यांना व्हॅनबाहेर काढले. काही क्षणातच व्हॅनने पेट घेतला. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केला. लीडींग फायरमन किशोर पाटील यांच्यासह इसहाक शेख, सुनील पाटील यांनी आग विझवली. बॅटरीत शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
वाहतूक कोंडी
व्हॅनला आग लागल्याने परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच वाहतूकही खोळंबली. शालिमारकडून द्वारकेच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबलेली होती. त्याचा परिणाम इतर मार्गांवर व लगतच्या चौकांमध्येही काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.