शतायुषी होण्यासाठी सिंगापुरी लोकांकडून शिका ‘या’ गोष्टी | पुढारी

शतायुषी होण्यासाठी सिंगापुरी लोकांकडून शिका ‘या’ गोष्टी

सिंगापूर : विविध आरोग्य जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, लोकांचे आयुष्य दिवसेंदिवस लांबत चालले आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत मानवाचे सरासरी वय 77 वर्षांपर्यंत वाढू शकते असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.

आयुर्मानाच्या बाबतीत जपान आणि काही युरोपीय देश आघाडीवर होते. आता या बाबतीत सिंगापूरचे नाव आघाडीवर असेल. सरकारी धोरणे व लोकांच्या जागरूकतेमुळे सिंगापूरमध्ये दीर्घायुषी लोकांची संख्या वाढली आहे. या शहरातील लोक आता 20 वर्षे जास्त जगू लागले आहेत. गेल्या दशकात शतकाचा टप्पा ओलांडणार्‍यांची संख्याही दुपटीने वाढली आहे.

ब्लू झोन एलएलसीचे संस्थापक आणि लेखक डॅन बुएटनर यांनी त्यांच्या अलीकडील पुस्तकांपैकी सिंगापूरला सहावा ब्लू झोन म्हणून घोषित केले आहे. या पुस्तकात उत्तम मानसिक आरोग्यासह निरोगी आयुष्य, समाधान आणि दीर्घायुष्याची रहस्ये शेअर केली आहेत.

चालणे, सार्वजनिक वाहतुकीवर भर

बुएटनर यांच्या मते, 6 दशलक्षांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले सिंगापूर अनेक अर्थांनी खास आणि वेगळे आहे. येथे चालणे आणि सार्वजनिक वाहतुकीवर सर्वाधिक भर दिला जातो. संपूर्ण शहरात प्रचंड हिरवळ आहे. घरांपासून मेट्रो स्टेशनपर्यंतचे कमाल अंतर 500 मीटर आहे. प्रदूषण कमी असेल तर फुफ्फुसाचा आजार होत नाही. श्वसन प्रणाली मजबूत राहते. येथील लोक दिवसाची सुरुवात व्यायामाने करतात. सकाळी किंवा संध्याकाळी उद्यानात जा. लोक एकमेकांना फिरायला प्रोत्साहन देतात. यामुळे चांगली झोप येते. निरोगी जीवनशैली भूक नियंत्रित करण्यास मदत करते.

आरोग्यदायी आहारावर भर :

येथील लोकांना प्रक्रिया केलेले अन्न खाण्याऐवजी निरोगी अन्न खाण्यास प्रोत्साहित केले जाते. अशा परिस्थितीत पौष्टिक खाद्यपदार्थांवर अनुदान मिळते. जोडीला सिंगापूरमधील आरोग्य क्षेत्र उत्तम आहे. इतर देशांच्या तुलनेत दर हजार लोकसंख्येमागे डॉक्टर आणि परिचारिका जास्त आहेत. शिवाय ही सगळी मंडळी नागरिकांना सर्वोत्तम सेवा देतात.

एकाकीपणाला थारा नाही

तारुण्य असो वा वृद्धापकाळ. एकटेपणा लोकांना हैराण करतो. म्हातारपणात एकटेपणा आजार बनतो. या परिस्थितीत परस्परांशी संवाद वाढवण्यासाठी, येथे घरांची रचना अशी आहे की, लोक त्यांच्या शेजार्‍यांशी संपर्कात राहतात. नवीन मित्रांची संख्या वाढते. जुन्या लोकांशी संबंध द़ृढ होतात. शिवाय सिंगापूरमध्ये पालकांसोबत राहण्यासाठी विविध करांमध्ये प्रचंड सूट मिळते. यामुळे युवापिढीकडून वृद्धांची चांगली काळजी घेतली जाते.

Back to top button