

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यामध्ये घरोघरी राष्ट्रवादी अभियानांतर्गत सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष "मी महाराष्ट्रवादी" कार्यक्रम राबवणार आहे अशी माहिती धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे व शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आणि कार्याध्यक्ष ललित वारूडे यांनी दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत धुळे शहरासह धुळे ग्रामीण, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना पक्षाचे नेते शरद पवार व पक्षाने केलेल्या प्रमुख कामांची माहिती देतील. तसेच नागरिकांना पॉकेट कॅलेंडर देऊन नागरिकांशी सुसंवाद साधतील. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कलुषित करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. दोन मराठी माणसांचे पक्ष फोडून महाराष्ट्राच्या अस्मितेला भाजपने धक्का लावला आहे. दिल्लीश्वरांनी रचलेल्या या कटाला चोख उत्तर देण्याची व महाराष्ट्राच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच नेते शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येणार आहे.
या अभियानाला साथ देण्यासाठी महाराष्ट्रप्रेमी जेष्ठ नागरिक, युवक, महिला- भगिनी,शेतकरी,कष्टकरी बांधव, व्यापारी तसेच नोकरदार बांधव यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे व रणजीत भोसले आणि कार्याध्यक्ष ललित वारूडे यांनी केले आहे.
हेही वाचा :