नाशिक क्राईम : पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर... | पुढारी

नाशिक क्राईम : पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीसह तिघींवर केले वार, त्यानंतर...

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : मला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्याशी बोल असे सांगूनही पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पत्नीसह तिच्या सोबत असलेल्या तिघींवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत शेवटी स्वतालाही भोसकून घेतले. या हल्ल्यात चारही महिला जखमी झाल्या असून हल्लेखोर पतीवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहीती अशी की, येथील चौरे मळ्यात नवरात्र उत्सवानिमित्त (दि. १९)  डान्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा बघून परत येत असतांना रात्री १०.३० वाजता लिना शुभम गोतरणे, तिची काकु सोनाली वाघ, चुलत बहीण राधिका वाघ व योगिता वाघ यांना लिनाचा पती शुभम शिवाजी गोतरणे याने अडवत लिना हिस मला तुझ्याशी बोलायचे असे म्हणत रस्त्यातच आडवा झाला. यावेळी पत्नी लिना हिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या शुभमने तीक्ष्ण हत्याराने आपली पत्नी लिनासह तिच्या सोबत असलेल्या तिच्या बहिणी व काकुवर सपासप वार करत त्याच तीक्ष्ण हत्याराने स्वताच्या छातीत देखील भोसकून घेतले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरीकांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या या चारही महिलांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. तर शुभम यास दुसऱ्या खाजगी दवाखान्यात दाखल केले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची प्रकृती स्थिर असून पतीची देखील प्रकृती स्थिर आहे. या दोघा पती-पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणाने कलह सुरू असून पत्नी आपल्या वडिलांकडे ओझर येथे राहत असून पतीच्या जाचास कंटाळून तिने या पुर्वी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.  कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाबाबत पत्नीने खटला दाखल केला असुन फिर्यादी पत्नी लिना गोतरणे हिच्या तक्रारीवरून पती शुभम गोतरणे याच्या विरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करत आहे.

हेही वाचा :

Back to top button