मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद मलिकचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा | पुढारी

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद मलिकचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा निकटवर्ती भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद मलिक याचा पाकिस्‍तानमधील वझिरीस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून खून केला. ‘जैश-ए-मोहम्मद’ व्यतिरिक्त दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता.

पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमधील मिराली भागात मास्‍क घातलेल्‍या बंदूकधाऱ्यांनी दाऊद मलिकवर गोळीबार केला. दाऊद मलिक एका खाजगी दवाखान्यात असताना हा हल्‍ला झाल्‍याचे वृत्त आहे. अज्ञात हल्लेखोर गोळीबार करत घटनास्थळावरून पसार झाले.

लष्कर-ए-जब्बारला जबर धक्‍का

दाऊद मलिकच्‍या हत्‍येमुळे लष्कर-ए-जब्बार या दहशतवादी संघटनेसह त्याच्याशी संबंधित असलेल्या दहशतवादी संघटनांच्‍या नेटवर्कलाही जबर धक्‍का बसल्‍याचे मानले जात आहे. पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांच्या हत्येच्या घटनांना वेग आला आहे. यापूर्वी, कैसर फारूक हा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता जो मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि एलईटी प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. तो कराचीच्या रस्त्यावर फिरत असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला करून गोळ्या घालून ठार केले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बालाकोट एअर स्ट्राइकमधून मलिक बचावला

यावर्षी पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले भारताचे अनेक मोस्ट वाँटेड दहशतवादी मारले गेले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बालाकोटवर हवाई हल्ला केला तेव्हा दाऊद मलिक तेथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या हल्ल्यात दाऊद मलिक फरार झाल्याची माहिती नंतर समोर आली. सर्व दहशतवादी आयएसआयच्या संरक्षणाखाली राहत असल्‍याचे समोर आले होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने मौलाना मसूद अझहर अफगाणिस्तानात असल्याचे सांगितले होते.

भारतातील मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्‍यांचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा

20 फेब्रुवारीला रावळपिंडीत बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाजवर गोळ्या झाडण्यात आल्या. केंद्र सरकारच्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. यानंतर मारला गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ हा पाकिस्तानातील गुजरांवाला येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वीच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. शाहिद लतीफ हा २०१६ च्या पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. त्याने आयएसआयकडून विशेष प्रशिक्षण घेतले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने लतीफला सियालकोट सेक्टरच्या प्रमुखाची जबाबदारी दिली होती.

आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ याची नुकत्‍याच बलुचिस्तान भागात गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्‍यात बहूर याचा मोठा वाटा असल्‍याचे सांगितले जाते. भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. तेथून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात ‘लष्कर-ए-तैयबा’चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कासिम याला रावळकोटमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. खलिस्तान कमांडो फोर्सचा अतिरेकी आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड परमजीत सिंग पंजवाड यालाही पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केले. याशिवाय हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी बशीर मीर उर्फ ​​इम्तियाज आलम आणि जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री यांचाही पाकिस्तानात खात्मा झाला. कंदहार विमान अपहरण प्रकरणात जहूर मिस्त्री सहभागी होता. भारतविरोधी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा कॅनडात मृत्यू झाला. या संदर्भात भारत आणि कॅनडा यांच्यात वाद सुरू आहे.

 

 

Back to top button