Dhule : साक्री बाजार समितीच्या भरारी पथकाचा दणका ; विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई | पुढारी

Dhule : साक्री बाजार समितीच्या भरारी पथकाचा दणका ; विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यात विनापरवाना बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कापूस व्यापाऱ्यांवर साक्री येथील बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई करत त्यांचे वाहन ताब्यात घेतले. बाजार समिती भरारी पथकाच्या या धडक कारवाईने बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

साक्री तालुक्यात अनेक बाहेर जिल्ह्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी येतात. मात्र ही खरेदी कुठल्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदा सुरू असल्याने याचा बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. तसेच अनेक वेळा शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याचेदेखील प्रकार यातून घडत असल्याने शेतकऱ्यांची देखील फसवणूक होते. यावर आळा घालण्यासाठी बाजार समितीतर्फे भरारी पथक नेमत सध्या धडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील दुसाने येथे बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या धरणगाव येथील श्रीजी जिनिंग व एरंडोल येथील श्री कृपा जिनर्स यांचे वाहन या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली. ही कारवाई बाजार समितीचे सचिव भूषण बच्छाव, संदीप अहिरराव, निजामपूर पोलिस ठाण्याचे सपोनी.हनुमंत गायकवाड, के.एफ. शेख, एस.एन.पदमोर यांनी केली.

बेकायदा खरेदी करू नका : बाजार समिती
कारवाईच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून व्यापाऱ्यांना बेकायदा खरेदी न करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रित शेतमालाची बेकायदा खरेदी-विक्री होत असल्याने हे कृत्य बाजार समितीच्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे,म्हणून जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सभेत बाजार समिती व सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी बोर्ड सचिव यांनी एकत्र येऊन भरारी पथक नेमत खासगी बेकायदा व्यवहारांवर शेतबांधावर, खासगी पथारी व इतर ठिकाणी होणाऱ्या विनापरवाना व बेकायदा खासगी व्यवहारावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर बांधावर,खासगी पथारी व इतर ठिकाणी शेतमालाचे खरेदी-विक्रीचे खासगी व्यवहार करू नये,अन्यथा संबंधितांवर कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम व उपविधीतील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बाजार समितीचे सभापती बन्सीलाल बाविस्कर, उपसभापती भानुदास गांगुर्डे, संचालक मंडळ,प्रभारी सचिव भूषण बच्छाव आदींनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button