

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहर, जामनेर, अमळनेर या ठिकाणी नोंद असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या. शहरात संशयित आरोपी हे विनानंबरची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी बाजारपेठ पोलिस सहायक निरीक्षक हरी होय, उपनिरीक्षक मंगेश जाधव आदींना आरोपीला पकडण्याच्या सूचना केल्या.
संशयित हे लाल रंगाची विनानंबरची दुचाकी चालवताना आढळला. त्याला नाव विचारले असता सय्यद शाहरूख सय्यद रहमान (29, रा. पंचशीलनगर, भुसावळ) असे सांगितले. तसेच साथीदारांनी भुसावळ, जामनेर, अमळनेर येथे दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यात दानिश उर्फ गोलू शरीफ खान (24, रा. भुसावळ), कामिलोद्दिन अजिज उद्दिन (30, रा. फैजपूर, ता. यावल) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केलेल्या. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विजय नेरकर अधिक तपास करीत आहेत.