छोटी भाभी, मोठी भाभी ही संजय राऊतांची संस्कृती : आमदार देवयानी फरांदे | पुढारी

छोटी भाभी, मोठी भाभी ही संजय राऊतांची संस्कृती : आमदार देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा’; छोटी भाभी, मोठी भाभी आम्हाला माहिती नाही. ही संजय राऊत यांची संस्कृती आहे. आम्हाला तर आता असा संशय येतो आहे की, राऊत मनोरुग्ण आहेत किंवा ते स्वत:च अमली पदार्थांचे सेवन करत असावेत’, अशा शब्दांत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. यावेळी भाजपचे तिन्ही आमदार कोणत्याही चौकशीला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वडाळा गावातील एमडी ड्रग्जनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी छोटी भाभी नावाच्या महिलेला अटक केली. याच्याच आधार घेत खासदार राऊत यांनी, आमदार फरांदे यांचा नाव न घेता, ‘मोठी भाभी’ असा उल्लेख केला. त्यावर आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. आमदार फरांदे म्हणाल्या, ललित पानपाटील हा शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे. अशात गृहखात्याने ललितचे आणि उद्धव ठाकरे यांचे कनेक्शन उघड करावे. राऊतांनी पुराव्याअभावी आरोप करणे थांबवावे. खरे तर आक्रोश मोर्चा हा ललितला मदत करण्यासाठी काढण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच सध्याचे सरकार दमदार कामगिरी करीत असून, या प्रकरणाच्या मुळापर्यंत ते जाणार आहे. या प्रकरणाशी निगडीत सर्व माहिती आम्ही वेळोवेळी पोलिस प्रशासनाला दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी विधानसभेतही या प्रकरणी आम्ही आवाज उठवला होता. अशात राऊत यांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे, असा इशारा देताना थेट नाव घेतल्यास आम्हा तिन्ही आमदारांकडून राऊतांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी अजित चव्हाण यांनीही राऊतांवर हल्लाबोल करताना ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हटले.

आठवडाभरात पोलिस आयुक्तांची बदली?

नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने मुंबई पोलिसांनी उघड केल्याने नाशिक पोलिसांची मोठी नाचक्की झाल्याची चर्चा आहे. याशिवाय पुणे पोलिसांकडूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात असल्याने, नाशिक पोलिस आयुक्तांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आठवडाभरात पोलिस आयुक्तांची बदली केली जाईल, अशी चर्चाही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये रंगल्याचे दिसून आले.

सात ते आठ जणांची यादी गृह खात्यास सुपूर्द

ड्रग्ज प्रकरणात आणखी सात ते आठ नावे असून, त्यांची यादीच गृह खात्याकडे सुपूर्द केली आहे. लवकरच ही नावे उघडकीस येऊन त्यांना अटक केली जाईल, असा दावाही आमदार फरांदे यांनी केला. तसेच मतदारसंघातील रोलेट व इतर अवैध धंद्ये बंद करण्यासाठी वेळोवेळी पोलिसांकडे पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button