नवे स्वप्न, नवी भरारी | पुढारी

नवे स्वप्न, नवी भरारी

भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 यासारख्या यशस्वी मोहिमांनंतर भारताने आता 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि 2040 पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते साकारण्यासाठी अंतराळ संशोधन विभाग चंद्रावरील स्थितीच्या अभ्यासासाठी एक आराखडा विकसित करणार आहे. यामध्ये चांद्रयान मोहिमांची मालिका, नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल विकसित करणे, नवीन प्रक्षेपण पॅडचे बांधकाम, मानवकेंद्रित प्रयोगशाळा स्थापन करणे आणि संबंधित तंत्रज्ञान यांचा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रयत्नांना बळ देण्याचा निर्धार करण्यात आला. या आव्हानात्मक क्षेत्रात एकेक नवे शिखर पादाक्रांत करीत आजघडीला भारत अग्रभागी पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अंतराळात जी काही उड्डाणे घेतली ती भारतानेच. भविष्यातील अनेक अंतराळ योजनांवर भारताकडून चाललेले काम जागतिक पातळीवरील उल्लेखनीय ठरत आहे.

इस्रोचे तत्कालीन प्रमुख डॉ. के. सिवन यांनी चार वर्षांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन केंद्राबाबत तसेच चंद्रावर पहिला भारतीय पाठविण्याचे सूतोवाच केले, त्याला गती देण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला. अंतराळातील घटनांबाबत समाजमनामध्ये प्रचंड कुतूहल असते, त्यामुळे अंतराळ स्थानक म्हणजे नेमके काय याबाबतचे कुतूहलही वाढले आहे. अंतराळ स्थानक म्हणजे कृत्रिम उपग्रहासारखी रचना असून, ती पृथ्वीच्या कक्षेत सोडली जाते आणि तिथेच राहते. माणसाला दीर्घकाळ अंतराळात राहता यावे, याद़ृष्टीने सर्व सोयीसुविधा या स्थानकात उपलब्ध करण्यात येतात. अंतराळातील घटनांचे निरीक्षण, सूर्य आणि चंद्राचा अभ्यास, पृथ्वीचा अभ्यास आदी गोष्टी स्थानकाच्या माध्यमातून करण्यात येतात.

माणूस दीर्घकाळ अंतराळात राहिल्यानंतर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, याचेही निरीक्षण याद्वारे करता येते. पृथ्वीवर जे संशोधन करणे शक्य होत नाही, अशी मानवाच्या फायद्यासाठीची अनेक संशोधने अवकाश स्थानकात करता येतात. सौरऊर्जा आणि बॅटरीजच्या माध्यमातून अवकाश स्थानक काम करते. छोटे अवकाश स्थानक हे पृथ्वीवरच जोडून प्रक्षेपित करण्यात येते. मात्र, मोठे अवकाश स्थानक तयार करण्यासाठी त्याचे छोटे छोटे भाग अवकाशात प्रक्षेपित करण्यात येतात. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत ते एकमेकांना जोडण्यात येतात. क्रू सदस्य आणि इतर वस्तू नंतर वेगळ्या प्रक्षेपित केल्या जातात. त्यामुळे अवकाश स्थानकाला हवा, पाणी, अन्न आणि विविध उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी वारंवार अवकाश वाहतूक करावी लागते.

गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रोकडून दोन अंतराळवीर 2022 मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, कोरोना महामारीने निर्माण केलेल्या अडचणीमुळे त्यात खंड पडला. या मोहिमेची पूर्ती होण्यासाठी आता 2025 उजाडण्याची शक्यता वर्तविली जाते. अलीकडच्या काळात इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्रात मिळवलेले यश जगाला तोंडात बोटे घालायला लावणारे. अशा मोहिमांचे यश संबंधित देशाचे आणि तेथील शास्त्रज्ञांचे असले तरी त्यातून होणारे संशोधन जगाला उपयुक्त ठरणारे असते. त्याच द़ृष्टिकोनातून भारताकडून अवकाश संशोधन क्षेत्रात अनेक मोहिमांची तयारी सुरू आहे. अंतराळात माणूस पाठवणे आणि अंतराळ स्थानक स्थापन करणे हा त्याचाच भाग.

सध्या अंतराळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनचे तियांगाँग अंतराळ स्थानक कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक विविध देशांच्या सहकार्यातून बनले असून, त्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी, नासा, रशिया, कॅ नडा आणि जपानने सहकार्य केले आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. या स्थानकाचा पहिला घटक 1998 साली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर घटक स्पेस शटलबरोबर तेथे पाठविण्यात आले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चारशे किलोमीटर अंतरावरील कक्षेत मार्गक्रमण करणार्‍या या स्थानकाचे वजन 465 टन आहे. माणसाने अवकाशात सोडलेला किंवा अवकाशातच जोडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा घटक म्हणून याकडे पाहिले जाते. यामध्ये सात अंतराळवीर राहू शकतात.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक प्रकल्पातून चीनला दूर ठेवल्यानंतर चीनने जिद्दीने स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवले. आजघडीला स्वतःचे अवकाश स्थानक असलेला चीन हा एकमेव देश आहे. चीनचे तियांगाँग अवकाश स्थानक 2022 पासून अंतराळात कार्यरत आहे. चीनकडून त्याला ‘आकाशातील राजवाडा’ किंवा ‘स्वर्गीय महाल’ असे अभिमानाने संबोधले जाते. यामध्ये सध्या दोन पुरुष आणि एक महिला, असे तीन अंतराळवीर आहेत. पृथ्वीपासून साडेचारशे किलोमीटर अंतरावर हे स्थानक असून, नोव्हेंबर 2022 साली चीनने या स्थानकाला अखेरचा अवशेष जोडला. तियांगाँग अंतराळ स्थानकामध्ये ‘तिआन्हे’ हा मुख्य भाग असून, त्यामध्ये राहून अंतराळवीर आपले काम करतात. सेलेस्टियल ड्रीम आणि क्विस्ट फॉर द हेवन्स या दोन प्रयोगशाळा ‘तिआन्हे’च्या दोन्ही बाजूस जोडलेल्या आहेत.

चीनने चालू वर्षात जुंटियन ही महाकाय अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित करण्याचे नियोजन केले आहे. ही दुर्बीण तियांगाँग अंतराळ स्थानकाचा भाग असणार नाही, मात्र या दुर्बिणीचा प्रवास अंतराळ स्थानकाशी समांतरच राहील. अंतराळ स्थानकाचे आयुष्य मर्यादित असल्यामुळे 2030 नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीच्या कक्षेतून बाजूला केले जाईल, असे सांगितले जाते. त्यानंतर अवकाशात चीनचे एकमेव अवकाश स्थानक उरेल. भारताकडून जेव्हा अवकाश स्थानक कार्यान्वित केले जाईल, त्यानंतर काही काळाने कदाचित ते एकमेव अंतराळ स्थानकही असू शकेल. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताकडून अंतराळ संशोधन आणि नवप्रकल्पांसाठी जगाच्याच अपेक्षा उंचावणे साहजिकच होते. त्या दिशेने देशाने दमदार पाऊल टाकले आहेच! चंद्रावर पहिला भारतीय पाठविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद.

Back to top button