धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव | पुढारी

धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावी त्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली जाईल, असा ठराव आज शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दरम्यान शहरातील डेंग्यू आजाराने जनता हैराण झाली असून शहरातील स्वच्छता आणि वाढती रोगराई प्रश्‍नावर शहर काँग्रेस आवाज उठविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांनी बैठकित सांगितले.

धुळे शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारीणी व निमंत्रित सदस्यांची आज काँग्रेस भवन येथे आढावा बैठक झाली. बैठकित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागात आणि वार्डानुसार अहवाल जाणून घेतला. शहरातील प्रत्येक भागात पक्षाचा विस्तार व्हावा, यासाठी यावेळी नियोजन करण्यात आले. दरम्यान यावेळी बोलतांना शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी सांगितले की, नाशिक येथे झालेल्या विभागीय आढावा बैठकित शहर काँग्रेसचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी धुळे शहरातील विधानसभेच्या सर्व्हेत काँग्रेस पक्षाला संधी असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यामुळे धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावी असा ठराव आजच्या बैठकित करण्यात आला असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले.

दरम्यान धुळे शहरात डेंग्यू आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून नागरीक आजाराने हैराण झाले आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील रोगराई आणि विविध समस्यांबाबत आवाज उठविला जाणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर निवेदन दिले जाईल. त्याचप्रमाणे धुळे शहर काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबीर घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली असल्याचे शहर अध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी सांगितले. बैठकित काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.एस.टी.पाटील, विलास पाटील, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, राजेंद्र खैरनार यामिनी खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, पितांबर महाले, मुकूंद कोळवले, अलोक रघुवंशी, दिपक गवळे, विलास पाटील, भिवसन अहिरे, मधुकर मरसाळे, किरण नगराळे, बानुबाई शिरसाठ, किशोर देसले, लहू पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button