मनमाड : भाऊबीजेच्या दिवशी 'त्‍या' तरूणाची हत्‍या करणारे संशयित जेरबंद | पुढारी

मनमाड : भाऊबीजेच्या दिवशी 'त्‍या' तरूणाची हत्‍या करणारे संशयित जेरबंद

मनमाड ; पुढारी वृत्‍तसेवा

भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकावर शिवम पवार या तरुणाची हत्‍या करण्यात आली होती. हत्‍या करून फरार झालेल्या 4 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. त्यांना रायगड जवळ नराळे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना बुधवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली. तरूणाची हत्या प्रकरणातील संशयितांना चार दिवसांत पोलिसांनी गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत शिवमच्या नातेवाईकांनी केली आहे.

शिवमची उल्हासनगर येथील तरुणीसोबत इंस्टाग्रामवर ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम पवार (उसवाड ता. चांदवड) याचे सुमारे दीड वर्षापूर्वी उल्हासनगर येथील एका तरुणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. या नंतर या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण होऊन दोघे एकमेकांना भेटू लागले.

दरम्यानच्या काळात सदर तरुणी सोबत इतर मुलांची ओळख असल्यामुळे तिचे त्यांच्या सोबत संबंध असल्याचा संशय शिवमला आला. या संशयावरून त्याचे या मुलांसोबत फोनवर भांडण देखील झाले होते. त्यानंतर शिवमने चेतन आणि मोहित नावाच्या तरुणांच्या नावाने इंस्टाग्रामवर फेकआयडी करुन त्यांचे अश्लिल फोटो टाकले. येथून वाद वाढत गेला.

शिवमवर चाकूने वार करून त्याची हत्त्या

हा वाद मिटविण्यासाठी सदर तरुणी आणि तिचे चार मित्र मनमाडला आले. येथे शिवम देखील आला, मात्र वाद मिटण्याऐवजी तो इतका विकोपाला गेला कि रेल्वे स्थानकाच्या प्लॉट फार्म 3-4 च्या मधोमध असलेल्या गार्डन जवळ शिवमवर चाकूने वार करून त्याची हत्त्या केली.

भाऊबीजेच्या दिवशी आणि प्रवाशांसमोर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ

या घटनेनंतर शिवमचे मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले होते. भाऊबीजेच्या दिवशी आणि प्रवाशांसमोर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस अधीक्षक वरिष्ठ अधिकारी मोक्षदा पाटील, पोलीस उपाधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी महेंद्र पाटील, संतोष भालेराव, प्रमोद जाधव, सागर पेठे यांचे एक पथक मुंबईला पाठवले होते. या पथकाने तीन दिवस मुक्काम ठोकून कोणत्याही परिस्थिती आरोपींना जेरबंद करण्याचा चंग बांधला होता. अखेर त्यांना आरोपी रायगडच्या नराळे भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्‍यावरून या पथकाने सापळा रचून चेतन मोधळे (वय 19, रा. कर्जत), मयूर कराळे (वय 20 रा. कर्जत), निशांत जमधाडे (वय 19 रा.कर्जत) आणि मोहित सुकेजा (वय 18 रा. उल्हासनगर) या चौघांना अटक करून मनमाडला आणले.

Back to top button