Nashik Crime : मालेगावात नशेच्या गोळ्या बाळगणार्‍या दोघांना अटक | पुढारी

Nashik Crime : मालेगावात नशेच्या गोळ्या बाळगणार्‍या दोघांना अटक

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; शहरात पुन्हा कुत्तागोली विक्रेत्यांनी डोके वर काढले आहे. बुधवारी (दि.11) आझादनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना गुंगीच्या औषधांसह अटक करण्यात आली. त्यात एका परप्रांतीयाचा समावेश आहे. (Nashik Crime)

ड्रग्स तस्कर ललित पाटीलचे प्रकरण उजेडात आल्यानंतर नाशिक पोलिस अंमल पदार्थविरोधी कारवाईत सतर्क झालेत. तर मालेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुंगीची औषधं विकणारे हाताला लागले आहेत. बुधवारी दोन वाजेच्या सुमारास नेहरु चौकातील बंद दुकानाजवळ संशयास्पद वावरणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ अल्प्राझोलन व नायट्राजेपमच्या 10 एमजीच्या टॅबलेट्सचा बॉक्स मिळून आला. दोघांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याने ते या गोळ्या अवैध मार्गाने विक्रीसाठी बाळगत असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी संशयित इब्राहिम शहा अकबर शहा (45, रा. बापूनगर, घर नंबर 5258, रांधेर रोड, सुरत ) हा रिक्षा चालक आणि आरिफ खान बशीर खान (42, रा. सोनिया कॉलनी, घर नंबर 12, मालेगाव) या दोघांवर अटकेची कारवाई होऊन शिपाई गोविंदा बिराडे यांनी फिर्याद नोंदवली आहे.

गुजरात कनेक्शन एमडी ड्रग्स प्रकरणाने राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कुत्तागोलीचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. वेळोवेळी विक्रेत्यांच्या मुचक्या आवळूनही त्यामागील टोळीचा पदार्फाश करण्यात अद्यापही पोलिस यंत्रणेला यश आलेले नाही. गुन्हेगारी जगतात अल्पाझोलमसह इतर औषधांना कुत्तागोली म्हणून संबोधले जाते. या गोळ्या स्वस्तातील असल्या तरी त्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री होत नाहीत. गुंगीकारक या गोळ्यांचे व्यसन अनेकांना जडल्याने सहज उपलब्ध न होणार्‍या गोळ्यांच्या पुरवठ्याची गैरव्यवस्था तयार झाली आहे. त्यातही गुटख्याप्रमाणेच या गोळ्या गुजरात राज्यातून शहरात पाठविल्या जात असल्याचे वेळोवेळीच्या कारवाईतून समोर आले आहे.

हेही वाचा :

Back to top button