‘नमो शेतकरी’तील निधी वितरणाला मान्यता | पुढारी

'नमो शेतकरी'तील निधी वितरणाला मान्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी एक हजार ७२० कोटींचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. कृषी विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यात राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालून नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १ हजार ७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता दिली. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Back to top button