स्वराज्य संघटनेत भूकंप; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

स्वराज्य संघटनेत भूकंप; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता स्वतंत्र पक्षाची स्थापना करून राज्यात नवा पर्याय उभा करू पाहणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या 'स्वराज्य' संघटनेत मोठा भूकंप झाला. राज्यभरातील तब्बल ६० टक्के पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, संघटनेतील महत्त्वपूर्ण संपर्कप्रमुखपदच बरखास्त करण्यात आले आहे. संपर्कप्रमुख करण गायकर यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

१२ मे २०२२ रोजी स्थापना केलेल्या 'स्वराज्य'चा संघटना ते राजकीय पक्ष असा प्रवास सुरू असतानाच संघटनेतील अंतर्गत कलह विकोपाला गेला. स्वराज्यप्रमुख संभाजीराजे यांच्यानंतर महत्त्वपूर्ण पद असलेल्या संपर्कप्रमुख पदावरील करण गायकर यांनी गेल्या ८ ऑक्टोबरला पदासह प्रवक्ता आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. संभाजीराजे यांनी मंगळवारी (दि.१०) त्यांचा राजीनामा मंजूर करीत संघटनेतील संपर्कप्रमुख पद आजपासून बरखास्त करण्यात येणार असल्याचा शेरा मारला. दरम्यान, गायकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरातील तब्बल ६० टक्के पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी सोमवारी (दि. ९) संघटनेचे प्रसिद्धिप्रमुख राहुल शिंदे यांनी संघटनेचे मराठवाडा सचिव राजेश मोरे, नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे, उमेश शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वाहुळे व नवनाथ शिंदे यांची संघटनेचे निर्णय व आचारसंहिता डावलल्याच्या कारणावरून संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बाब समोर आली होती. तत्पूर्वी संपर्कप्रमुखांनीच राजीनामा दिल्याचे समोर आल्याने संघटनेत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, करण गायकर यांनी 'छावा क्रांतिवीर संघटना' स्वराज्य संघटनेत विलीन करून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत संभाजीराजे यांच्यासोबत नवी वाट निवडली होती. मात्र, वर्षभरातच त्यांना संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागल्याने, संघटनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी आगामी लोकसभेसह विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या मैदानात स्वराज्य उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, निवडणुकांच्या तोंडावरच संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने, संघटनेच्या भवितव्याबाबतच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मी राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील तब्बल ६० टक्के पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने राजीनामे दिले आहेत. मी स्वराज्यप्रमुखांवर नाराज नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीही किंतू-परंतु नाही. मात्र, संघटनेतील काही गोष्टी मनाला न पटल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे.

– करण गायकर, माजी संपर्कप्रमुख, स्वराज्य

करण गायकर यांच्यासह रायगडमधील काही पदाधिकाऱ्यांनी संघटनेत परस्पर नियुक्त्या करून पदे वाटली होती. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वीच राज्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशात या राजीनाम्यांना अर्थ उरत नाही. राजीनामे देताना त्यांनी वैयक्तिक कारणे पुढे केली आहेत. त्यामुळे संघटनेत काही दोष आहे, असे म्हणता येणार नाही. राजीनामे दिलेल्यांची मनधरणी केली जाणार नाही.

– राहुल शिंदे, प्रसिद्धिप्रमुख, स्वराज्य

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news