Israel Gaza : गाझा पट्टीत ३ लाख ४० हजाराहून अधिक लोक बेघर | पुढारी

Israel Gaza : गाझा पट्टीत ३ लाख ४० हजाराहून अधिक लोक बेघर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध (Israel-Hamas War) सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. आतापर्यंत दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई दलाच्या गोळीबारात आतापर्यंत १२०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ३ लाख ४० हजाराहून अधिक लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी त्यांचे सैन्य हमासच्या सर्व खुणा पुसून टाकेल, असे म्हटले आहे.

‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली संरक्षण दलांनी गुरुवारी सांगितले की, ते गाझा पट्टीतील हमासची दहशतवादी ठिकाणे मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करत आहेत. इस्रायली सैन्यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून गाझातील सीमारेषा ओलांडून शहरे आणि खेड्यांमध्ये घुसखोरी केली. १२०० हून अधिक लोकांना ठार मारले. गाझा पट्टीच्या २.३ दशलक्ष लोकांपैकी बहुतेकांना वीज आणि पाणी नाही. ३ लाख ४० हजाराहून अधिक लोक आता बेघर आहेत. इस्रायलकडून रॉकेट हल्ले सुरूच आहेत. तेथील लोकांकडे पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. दरम्यान, इजिप्तनेही इस्रायलमधून पळून आलेल्या निर्वासितांना आश्रय देण्यास नकार दिला आहे.

हमासने शनिवारी इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इस्रायलने गाझा पट्टी आणि विशेषतः हमासच्या अनेक स्थानांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत २४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १२०० लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

Back to top button